ENG vs IND : दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल, कोचकडून मोठी अपडेट

India Playing 11 For 2nd Test Against England : इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित झालं आहे. याबाबतची माहिती भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेश्काटे यांनी दिली आहे.

ENG vs IND : दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल, कोचकडून मोठी अपडेट
Shubman Gill And Test Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 30, 2025 | 11:31 PM

भारतीय क्रिकेट संघाला लीड्समध्ये खेळवण्यात आलेल्या पहिला कसोटी सामना गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे गमवावा लागला. इंग्लंडने हा सामना 5 विकेट्सने जिंकून विजयी सलामी दिली आणि मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा कसोटी सामना हा 2 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने अंतिम 11 खेळाडूंमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यानंतर आता टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. तसेच नव्या खेळाडूंनाही संधी मिळू शकते.

टीम इंडियाबाबत मोठी अपडेट

टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेश्काटे यांनी दुसऱ्या कसोटीतील प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठी अपडेट दिली आहे. रायन टेन डेश्काटे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. रायन टेन डेश्काटे यांनी जसप्रीत बुमराह दुसऱ्या सामन्यातील निवडीसाठी उपलब्ध असेल, मात्र तो खेळणार की नाही हे 24 तासांमध्ये निश्चित होईल, अशी माहिती दिली आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे 5 पैकी 3 कसोटी सामन्यांमध्येच खेळणार असल्याचं जसप्रीत बुमराह याने या मालिकेआधी स्पष्ट केलं होतं.

तसेच दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 फिरकी गोलंदाजांना संधी मिळू शकते. कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांचा समावेश केला जाऊ शकतं, असं डेश्काटेने सांगितलं.

रायन टेन डेश्काटे काय म्हणाले?

“जसप्रीत बुमराह निश्चितपणे निवडीसाठी उपलब्ध आहे. बुमराह 5 पैकी 3 सामन्यांमध्ये खेळणार असल्याचं आपल्या सर्वांना माहित आहे. बुमराहला पहिल्या कसोटीनंतर 8 दिवसांचा वेळ मिळाला आहे. दुसऱ्या सामन्याबाबत आम्ही काहीही निर्णय घेतलेला नाही. बुमराहला खेळपट्टी आणि हवामानाच्या दृष्टीने दुसऱ्या कसोटीत खेळवल्याने फायदा होणार असेल, तर आम्ही अखेरच्या क्षणी तसा निर्णय घेऊ”, असंही डेश्काटे यांनी सांगितलं

तसेच भारतीय संघात 2 मुख्य फिरकी गोलंदाजांचा समावेश केला जाऊ शकतो, असं डेश्काटने सांगितलं. “2 फिरकी गोलंदाज दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे. आता ते 2 स्पिनर कोण असणार, याचा निर्णय व्हायचा आहे. बॅटिंगला हातभार लागावा, या हिशोबाने फिरकी गोलंदाजंची निवड केली जाईल. तिन्ही फिरकी गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. वॉशिंग्टन बॅटिंगही करतो. आता कुणाला प्राधान्य दिलं जातं? हे पाहावं लागेल”, असंही डेश्काटे यांनी या वेळेस स्पष्ट केलं.