
टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याआधी दिनेश कार्तिक याने 1 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. या दरम्यान रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर सर्वात छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. तेव्हापासून टीम इंडियाची युवाब्रिगेड ही टी 20i क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत आहे. हे युवा खेळाडू परिस्थिती आणि गरजेनुसार खेळत असल्याने निवडक खेळाडूंनी तिन्ही फॉर्मेटमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे अनेक अनुभवी खेळाडूंना संधी मिळणं अवघड होऊन बसलंय. अशात शिखर धवनंतर टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू निवृत्ती घेऊ शकतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा साडे तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून बाहेर आहे. त्यामुळे इशांत निवृत्ती जाहीर करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सद्यस्थिती पाहता इशांतची टीम इंडियात निवड होईल आणि त्यानंतर संधी मिळेल, असं वाटत तरी नाही. त्यामुळे इशांतचं कमबॅक जवळपास नाहीच्या बरोबर आहे. तसेच इशांतचं वय हे 35 इतकं आहे. त्यामुळे इशांतला खरंच संधी द्यावी का? हा मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे इशांतकडे निवृत्तीशिवाय कोणताही पर्याय नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, या आणि इतर गोलंदाजांनी आपलं स्थान भक्कम केलंय. त्यात गौतम गंभीर कोच झाल्यापासून प्रत्येक जण बॉलिंग करतोय. त्यामुळे इशांतच्या कमबॅकची आशा धुसरच आहे.
इशांत शर्माने टीम इंडियाचं 105 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. इशांतने कसोटीत 311 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 80 एकदिवसीय सामन्यात 115 विकेट्स मिळवल्या आहेत. तर 14 टी 20 सामन्यात अनुभवी गोलंदाजाने 8 विकेट्स मिळवल्या आहेत. ईशांतने 2007 साली कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानंतर इशांतने वनडे डेब्यू केलं. मात्र इशांतला 2016 नंतर एकदाही वनडे मॅचमध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे इशांत शर्मा याने येत्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यास क्रिकेटच्या चाहत्यांना आश्चर्य वाटणा्र नाही, हे मात्र निश्चित.