Champions Trophy 2025 : रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पोहचताच आयसीसीकडून मोठा झटका, काय झालं?

Icc Champions Trophy 2025 Final Rohit Sharma : रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मात्र त्यानंतर काही तासांमध्ये कर्णधार रोहित शर्मा याला मोठा झटका लागला आहे.

Champions Trophy 2025 : रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पोहचताच आयसीसीकडून मोठा झटका, काय झालं?
| Updated on: Mar 05, 2025 | 5:05 PM

टीम इंडियाने 4 मार्चला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला. टीम इंडियाने या विजयासह चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये सलग तिसऱ्यांदा पोहचण्याची कामगिरी केली. टीम इंडियाने यासह कांगारुंच्या पराभवाची परतफेड केली. याच कांगारुंनी टीम इंडियाला वर्ल्ड कप फायनल 2023 मध्ये पराभूत केलं होतं. टीम इंडियाचा हा दुबईतील नववा एकदिवसीय विजय ठरला. आता टीम इंडिया अंतिम फेरीसाठी सज्ज झाली आहे. अंतिम फेरीतील सामना हा 9 मार्च रोजी होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजयी संघाविरुद्ध भारतीय संघाचा अंतिम फेरीतील सामना होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला मोठा झटका लागला आहे.

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत रोहितला फटका बसला आहे. रोहित शर्माला फलंदाजांच्या क्रमवारीत 2 स्थानांचा फटका बसला आहे. रोहितची तिसऱ्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. रोहितचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या इतर फलंदाजांना मात्र तगडा फायदा झाला आहे.

आयसीसीच्या या रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये 4 फलंदाजांचा समावेश आहे. उपकर्णधार शुबमन गिल याने आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. विराटने एका स्थानाची झेप घेतलीय. विराट पाचव्यावरुन चौथ्या स्थानी पोहचला आहे. पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिक क्लासेन तिसऱ्या स्थानावर आहे.

रोहितला नुकसान कशामुळे?

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने उपांत्य आणि साखळी फेरीतील 3 असे एकूण सलग 4 सामने जिंकले आहेत. रोहितला या चारही सामन्यात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. रोहितला चारही सामन्यात अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. रोहितने या 4 सामन्यात अनुक्रमे 41, 20, 15 आणि 28 अशा धावा केल्या.

शुबमन पहिल्या स्थानी कायम, रोहितला झटका

श्रेयस अय्यरची उडी

दरम्यान श्रेयस अय्यर याला या रँकिंगमध्ये एका स्थानाचा फायदा झालाय. श्रेयस नवव्या स्थानावरुन आठव्या क्रमांकावर पोहचलाय. श्रेयसने न्यूझीलंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक क्षणी महत्त्वाची खेळी केली. श्रेयसने न्यूझीलंडविरुद्ध 79 तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 45 धावांची खेळी केली. श्रेयसला या खेळीच्या फायदा हा रँकिंगमध्ये झाला.