IND vs SA Final :ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियाने रचले इतके सारे विक्रम, पहिल्यांदाच असं घडणार

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने 338 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. पण भारताने हे लक्ष्य फक्त 5 गडी गमवून पूर्ण केलं.

IND vs SA Final :ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियाने रचले इतके सारे विक्रम, पहिल्यांदाच असं घडणार
IND vs SA Final :ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियाने रचले इतके सारे विक्रम, पहिल्यांदाच असं घडणार
Image Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Oct 30, 2025 | 11:37 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 338 धावा केल्या आणि विजयासाठी 339 धावांचं आव्हान दिलं. खरं तर हे आव्हान खूपच मोठं होतं. अनेकांनी तर विजयाच्या आशाच सोडून दिल्या होत्या. त्यात शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना स्वस्तात बाद झाल्यानंतर हा सामना हातून गेला असंच वाटत होतं. पण जेमिमा रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी झुंजार खेळी करत 167 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला गेला. जेमिमा रॉड्रिग्सने 134 चेंडूत नाबाद 127 धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 89 धावांची खेळी केली. एक वेळ धावा आणि चेंडूंचं अंतर खूप जास्त होतं. पण दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी आक्रमक फटकेबाजी करत हे अंतर कमी केलं. भारताने हा सामना 5 विकेट आणि 9 चेंडू राखून जिंकला.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडणार

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच नवा विजेता मिळणार आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी या स्पर्धेत विजय मिळवला आहे. आता पहिल्यांदाच वर्ल्डकप न जिंकणारे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. हा सामना 2 नोव्हेंबरला होईल. या सामन्यात क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळणार हे  नक्की झालं आहे.

भारतीय संघाने उपांत्य फेरीत रचले इतके सारे विक्रम

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पुरुष किंवा महिलांच्या बाद फेरीत 300 पेक्षा जास्त धावा करण्याची पहिलीच वेळ आहे. याआधीचा सर्वोच्च धावसंख्या 2015 च्या मेन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 298 धावा होती. हा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघात झाला होता.

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 339 धावांचं लक्ष्य गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध याच स्पर्धेतील साखळी फेरीत केला होता. भारताने विजयासाठी दिलेल्या 331 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने गाठलं होतं. आता भारताने हा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी भारताने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत महिला संघाने 265 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

वनडे क्रिकेट इतिहासातील ही दुसरी मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत झालेल्या सामन्यात एकूण 781 धावा झाल्या होत्या. आता भारत ऑस्ट्रेलिया यांनी मिळून उपांत्य फेरीत 679 धावा केल्या आहेत.

भारताने 341 धावा करत वुमन्स वनडे सामन्यातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या केली आहे. मागच्या महिन्यात दिल्लीत याच संघाविरुद्ध त्यांनी 369 धावा केल्या होत्या.

भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत तिसऱ्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी 2005 आणि 2017 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळेस उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.