Jasprit Bumrah : .. स्वत:च्या मर्जीनुसार ठरवू शकत नाहीत, माजी कर्णधाराकडून बुमराहची कानउघडणी, वर्कलोडवरुन स्पष्टच म्हटलं

Jasprit Bumrah Workload : टीम इंडियाचा प्रमुख आणि मॅचविनर बॉलर जसप्रीत बुमराह वर्कलोडमुळे गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. बुमराह इंग्लंड दौऱ्यात 5 पैकी 3 सामन्यांमध्येच खेळला होता.

Jasprit Bumrah : .. स्वत:च्या मर्जीनुसार ठरवू शकत नाहीत, माजी कर्णधाराकडून बुमराहची कानउघडणी, वर्कलोडवरुन स्पष्टच म्हटलं
Jasprit Bumrah and Gautam Gambhir
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 12, 2025 | 9:17 PM

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतील 5 पैकी फक्त 3 सामनेच खेळला. बुमराहने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंड दौऱ्यात फक्त 3 सामन्यांमध्येच खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र इंग्लंड दौरा आटोपल्यानंतरही बुमराहच्या वर्कलोडची चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. बुमराहला सातत्याने दुखापत होत असल्याने त्याला महत्त्वाच्या सामन्यांना मुकावं लागलं आहे. या मुद्द्यावरुनच भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी बुमराहची कानउघडणी केली आहे. भारताला कोणत्याही स्थितीत बुमराहची फारच गरज पडली तर काय होईल? असा प्रश्न अझरुद्दीन यांनी उपस्थित केला.

अझरुद्दीन यांच्याकडून बुमराहची कानउघडणी!

मिड-डे ने दिलेल्या वृत्तानुसार मोहम्मद अझरुद्दीन म्हणाले की, “जर दुखापत असेल तर खेळाडू आणि क्रिकेट बोर्डाला याबाबतचा निर्णय घेऊन द्यायला हवा. मात्र जेव्हा टीममध्ये असता तेव्हा तुम्ही कोणत्या सामन्यात खेळायचं हे स्वत:च्या मर्जीनुसार ठरवू शकत नाहीत. वर्कलोड मान्य आहे. मात्र या स्तरावर तुम्हाला परिस्थितीनुसार व्यवहार करावा लागेल. तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात”.

“मोहम्मद सिराज याने प्रसिध कृष्णा आणि आकाश दीप यांच्यासह चांगली कामगिरी केली होती. विशेष म्हणजे बुमराहशिवाय आम्ही सामना जिंकला ही जमेची बाजू आहे. मात्र भारताला जेव्हा बुमराहची गरज जास्त असेल तेव्हा काय होईल?” असा प्रश्न अझरुद्दीन यांनी उपस्थित केला.

शुबमन गिल याचं कौतुक

अझरुद्दीन यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याचं कौतुक केलं. शुबमन भारत-इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने 5 सामन्यांमध्ये एकूण 754 धावा केल्या.

अझरुद्दीनकडून टीम इंडियाच्या तिघांचं नाव घेत कौतुक

“इंग्लंड दौऱ्याआधी कर्णधार शुबमन गिल याच्यावर टीका करण्यात आली. मात्र याच युवा संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. शुबमन गिल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. तसेच गिलने कर्णधार म्हणून अप्रतिम सुरुवात केली”, असंही अझरुद्दीन यांनी म्हटलं.