Shikhar Dhawan | शिखर धवन याच्यासोबत उघड उघड अन्याय, ‘हा’ दिग्गज अखेर बोललाच

Team India Shikhar Dhawan | बीसीसीआय निवड समितीकडून शिखर धवन याला डावललं जात असल्याचं म्हटलं जात होतं. आता अखेर धवनबाबत दिग्गजाने रोखठोक भूमिका मांडली आहे.

Shikhar Dhawan | शिखर धवन याच्यासोबत उघड उघड अन्याय, हा दिग्गज अखेर बोललाच
| Updated on: Aug 17, 2023 | 6:21 PM

मुंबई | आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. आगामी 2 मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया झोकून तयारीला लागली आहे. टीम इंडियात अनेक महिन्यांनी जसप्रीत बुमराह याचं दुखातीनंतर कमबॅक झालंय. ज्यामुळे टीम इंडियाची ताकद आणखी वाढली आहे. जसप्रीत बुमराह आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या दरम्यान टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि हेड कोच रवी शास्त्री यांनी सलामीवीर शिखर धवन याच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

शिखर धवन गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. शिखरला एशियन गेम्स 2023 साठी नेतृ्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्याचा टीममध्येही समावेश करण्यात आला नाही. तसेच आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठीही शिखर धवन याला संधी दिली गेली नाही. त्यामुळे कुठेतरी शिखर धवन याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे, का अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली. मात्र रवी शास्त्री यांनी धवनबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत रोखठोक भूमिका मांडत टीम मॅनेजमेंट खडेबोल सुनावले आहेत. तसेच वर्ल्ड कप 2023 टीमबाबतही रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली.

रवी शास्त्री काय म्हणाले?


“शिखर धवन याला तेवढं श्रेय दिलं जात नाही, जेवढ्यास तो पात्र आहे. शिखर धवन खरंच पट्टीतला खेळाडू आहे. आम्ही वर्ल्ड कप 2019 मध्ये शानदार कामगिरी केली. मात्र आम्ही सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध अपयशी ठरलो. शिखर धवन नेमका त्याच मॅचमध्ये नव्हता. टॉप ऑर्डरमधील पहिले 3 बॅट्समन हे राऊट हँडेड (उजव्या हाताने खेळणारे) होते. मात्र स्विंगमुळे मॅचचा निकाल दुसऱ्या बाजूने लागला.”, असं रवी शास्त्री यांनी स्पष्ट केलं. शास्त्री स्टार स्पोर्ट्स्वर एका कार्यक्रमात बोलत होते.

रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कप 2023 साठी प्लेइंग इलेव्हनबाबत आपलं मत मांडलं. जर टीम इंडिया राईट हँडेड बॅट्समनच्या शोधात असेल, तर योग्य बॅट्समनची निवडीची सर्वस्व जबाबदारी ही निवड समितीची आहे. तिलक वर्मा यासाठी परफेक्ट आहे. तिलक वर्मा याला संधी द्यायला हवी. तसेच यशस्वीला संधी द्यायची असेल, तर त्याचाही समावेश करु शकता”, असंही शास्त्री यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान अजूनही आशिया कपसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, निवड समिती श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांच्या फिटनेस अपडेटसाठी वेटिंगवर आहे. त्यामुळे येत्या 2-3 दिवसात आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.