
टीम इंडियाचा युवा आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा गेल्या अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. बीसीसीआय निवड समितीने अवघ्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर केला. निवड समितीने हर्षितला दोन्ही मालिकेसाठी संधी दिली. हर्षितला गेल्या अनेक मालिकांपासून सातत्याने संधी दिली जात आहे. हर्षित हेड कोच गौतम गंभीर यांच्या मर्जीतला खेळाडू असल्याने त्याला वारंवार संधी दिल्याचा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे हर्षितला ट्रोल केलं जात आहे. यावरुन गंभीरचा पारा चढला. हर्षितला ट्रोल करणाऱ्यांना गंभीरने विंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर चांगलेच खडेबोल सुनावले. गंभीरने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवशी विंडीजवर 7 विकेट्सने मात केली. टीम इंडियाने यासह विंडीजचा 2 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर गंभीरने पत्रकार परिषदला संबोधित केलं. या दरम्यान गंभीरला हर्षितला ट्रोल करण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. यावरुन गंभीरने संयमीपणे मात्र संतापून उत्तर दिलं.
“तुम्ही एका 23 वर्षांच्या मुलाला वैयक्तिक पातळीवर टार्गेट करत आहात, हे लाजिरवाणं आहे. हर्षितचे वडील हे माजी अध्यक्ष, माजी क्रिकेटपटू किंवा अधिकारी नाहीत. हर्षितही आजही स्वत:च्या हिंमतीवर आहे. त्यामुळे हर्षितला टार्गेट करणं योग्य नाही. यावरुन सोशल मीडियावरील लोकांची मानसिकता काय आहे हे समजतं”, असं गंभीरने म्हटलं.
“कोणताही मुलगा जेव्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो तेव्हा चांगली कामगिरी करणं ही त्याची प्राथमिकता असते. देशासाठी चांगलं खेळावं, असा त्याचा प्रयत्न असतो. फक्त युट्यूब चॅनेल चालवण्यासाठी कुणाबाबत काहीही म्हणू नका”, असं म्हणत गंभीरने माध्यमांनाही सुनावलं.
“तसेट टार्गेट करायचं असेल तर मला करा. मी त्या दबावाचा सामना करेन पण त्या मुलाला (हर्षितला) सोडा. हीच बाब दुसऱ्या खेळाडूंबाबतही लागू होते”, असंही गंभीरने या वेळेस ठणकावून सांगितलं.
दरम्यान टीम इंडियाने विंडीजला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. भारताने पहिल्या सामन्यात विंडीजवर अडीच दिवसातच डाव आणि 140 धावांनी मात केली. त्यानंतर दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिज टीमवर 7 विकेट्सने विजय मिळवला.