IND vs WI : टीम इंडिया 7 विकेट्सने विजयी, विंडीज विरुद्ध सलग 10 वी कसोटी मालिका जिंकली
India vs West Indies 2nd Test Match Result : वेस्ट इंडिजने टीम इंडियाला विजयासाठी चौथ्या दिवशी 121 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध सलग आणि एकूण दुसरा कसोटी सामना जिंकला आहे. विंडीजने भारताला 121 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 35.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताने या विजयासह विंडीजला 2-0 अशा फरकाने व्हाईटवॉश केलं आहे. टीम इंडियाचा विंडीज विरुद्धचा सलग 10 वा तर शुबमन गिल याच्या नेतृत्वातील पहिला कसोटी मालिका विजय ठरला आहे. तसेच टीम इंडियाने या विजयासह हेड कोच गौतम गंभीर याला बर्थडे गिफ्टही दिलं.
टीम इंडियाने चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत 121 धावांचा पाठलाग करताना 1 विकेट गमावून 63 रन्स केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल याच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. यशस्वी 8 धावा करुन मैदानाबाहेर परतला. तर केएल राहुल आणि साई सुदर्शन ही जोडी नाबाद परतली होती. त्यामुळे भारताला पाचव्या आणि अंतिम दिवशी आणखी 58 धावांची गरज होती. भारताने या धावा आणखी 2 विकेट्स गमावून पूर्ण केल्या.
साई सुदर्शन याने 76 बॉलमध्ये 5 फोरसह 39 रन्स केल्या. तर कॅप्टन शुबमन गिल 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या जोडीने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. ध्रुवने नाबाद 6 धावा केल्या. तर केएल राहुल याने भारताच्या विजयात दुसऱ्या डावात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. केएलने 108 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली.
टीम इंडिया 500 पार
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून 134.2 ओव्हरमध्ये पहिला डाव हा 5 आऊट 518 रन्सवर घोषित केला. भारतासाठी यशस्वी जैस्वाल याने सर्वाधिक 175 धावा केल्या. तर कॅप्टन शुबमन गिल याने 129 रन्स केल्या. तसेच साई सुदर्शनने 87 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनाही धावा केल्या. तर जोमेल वॉरिकॅन याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
विंडीज पहिल्या डावात ढेर
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 81.5 ओव्हरमध्ये सर्वबाद 248 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाने विंडीजला फॉलोऑन दिला. विंडीजने दुसऱ्या डावात चिवट प्रतिकार केला आणि भारताला दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी भाग पाडलं.
विंडीजचा तिखट प्रतिकार
विंडीजने दुसऱ्या डावात 118.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 390 रन्स केल्या. विंडीजसाठी 51 वर्षांनंतर पहिल्यांदाच टीम इंडिया विरुद्ध एकाच डावात 2 फलंदाजांनी शतक झळकावलं. जॉन कँपबेल याने 115 तर शाई होप याने 103 धावांचं योगदान दिलं. तर दहाव्या विकेटसाठी जस्टीन ग्रेव्हज आणि जेडन सील्स या जोडीने 79 धावांची भागीदारी केली. त्यामुळे विंडीजला 120 धावांची आघाडी घेता आली. जेडनने 32 धावा केल्या. तर जस्टीन ग्रेव्हज याने नाबाद 50 धावांचं योगदान दिलं. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद सिराजने दोघांना बाद केलं. तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
विंडीज विरुद्ध सलग 10 वा मालिका विजय
त्यानंतर भारताने चौथ्या दिवसापर्यंत विजयी आव्हानातील 121 पैकी 63 धावा केल्या. तर भारताने उर्वरित धावा अंतिम दिवशी पूर्ण करत सामन्यासह मालिका जिंकली आणि विंडीजला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. भारताने यासह विंडीज विरुद्ध सलग दहावी कसोटी मालिका जिंकली.
