
न्यूझीलंडने टीम इंडियाला रविवारी 18 जानेवारीला इंदूरमधील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात पराभूत केलं. न्यूझीलंडने यासह भारताची इंदूरमधील दहशत संपवली. टीम इंडिया या सामन्याआधी इंदूरमध्ये अजिंक्य होती. मात्र न्यूझीलंडने इंदूरमधील इतिहास बदलला. भारतासाठी 338 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली याने शतक तर नितीश कुमार रेड्डी याने अर्धशतक झळकावलं. तसेच हर्षित राणा यानेही अर्धशतक ठोकून न्यूझीलंडची हवा टाईट केली होती. मात्र त्यानंतरही भारताला सामना जिंकता आला नाही. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. तर भारतावर यासह अनेक वर्षांनी मायदेशात एकदिवसीय मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली.
टीम इंडिया, कर्णधार शुबमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर यांना या पराभवानंतर टीकेचा सामना करावा लागला. भारताला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर आता टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेला 21 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी हेड कोच गौतम गंभीर न्यूझीलंडची फिल्डिंग’ लावण्यासाठी मैदानात उतरला.
हर्षितने न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या वनडेत चाबूक अर्धशतकी खेळी करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे आता चाहत्यांना हर्षितकडून टी 20I सीरिजमध्येही अशाच वादळी खेळीची आशा असणार आहे. त्यासाठीच गंभीरने हर्षितला नागपूर सामन्याआधी बॅटिंगचे धडे दिले. गंभीरने हर्षितसोबत बराच वेळ सराव केला.
हर्षितने गंभीरच्या मार्गदर्शनात जवळपास 2 तास बॅटिंग प्रॅक्टीस केली. हर्षितने या दरम्यान फटकेबाजी केली. हर्षित साधारण आठव्या किंवा नवव्या स्थानी बॅटिंग करतो. हर्षितमध्ये बॅटिंग करण्याची क्षमता आहे. हर्षितने त्याच्या बॅटिंगचा ट्रेलर इंदूरमध्ये दाखवून दिलाय. हर्षितने इंदूरमध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर आता गंभीरने हर्षितच्या बॅटिंगवर मेहनत घेतलीय. त्यामुळे आता चाहत्यांना वनडेनंतर टी 20I मध्ये अशाच खेळीची प्रतिक्षा असणार आहे.
हर्षित राणा या जोरदार सरावानंतर पहिल्या टी 20I सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याच्यासाठी कुणाला बाहेर बसावं लागू शकतं? हे निश्चित नाही. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप या दोघांवर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे. वरुण चक्रवर्ती याच्यावर फिरकीची जबाबदारी आहे. तर मग हर्षितसाठी कुलदीप यादव याला बाहेर बसावं लागणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.