गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आणखी एक वनडे मालिका गमावली, तरी फासे बरोबर पडले!
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाला आणखी एक डाग लागला. गौतम गंभीरवर चोहूबाजूने टीका होत आहे. असं असूनही त्याने एका बाबतीत बाजी मारली.

IND vs NZ: न्यूझीलंडने टीम इंडियाला भारतात येऊन दुसऱ्यांदा पराभूत केलं आहे. पहिल्यांदा कसोटी मालिकेत, त्यानंतर आता वनडे मालिकेत पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाने भारतात पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावली आहे. त्यामुळे गौतम गंभीर याच्यावर टीका होत आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाला उतरती कला लागली असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण भारतीय संघाने एका पाठोपाठ एक मालिका गमवण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे अनेक नकोसे विक्रम भारताच्या नावावर प्रस्थापित झाले आहे. त्यामुळे त्याच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. असं असताना गौतम गंभीर मात्र एका बाबतीत सरस ठरला आहे. नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.. तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.
गौतम गंभीरचा डाव लावलेला खेळाडू चालला
गौतम गंभीरला एखाद्या खेळाडूत क्षमता दिसली तर त्याच्यावर किती टीका झाली तर तो त्याला संधी दिल्याशिवाय राहात नाही. गौतम गंभीरने असं हार्षित राणासोबत केलं. हार्षित राणाला संघात संधी देत असल्याने टीकेचा धनी ठरला होता. असं असूनही त्याला वनडे, टी20 आणि कसोटीतही संधी दिली. त्यामुळे हार्षित राणाची गरज प्रत्येक फॉर्मेटमध्ये आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याची पाठराखण करत गंभीरने अनेकदा स्पष्ट केलं आहे की, हार्षित हा अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीत बसतो. गोलंदाजीत तो सक्षम आहे यात काही शंका नाही. पण आठव्या क्रमांकावर फलंदाजीही करू शकतो. हार्षित राणाने न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेत तसंच करून दाखवलं. त्यामुळे गौतम गंभीरने हार्षित राणावर लावलेला डाव योग्य ठरला.
हार्षित राणाने तिसऱ्या वनडे सामन्यात तीन विकेट घेतल्या. इतकंच काय तर कठीण काळात विराट कोहलीसोबत चांगली भागीदारी केली. हार्षितने गोलंदाजीसोबत फलंदाजी करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिलं अर्धशतकही ठोकलं. त्याने 43 चेंडूत 52 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 4 षटकार मारले. हार्षित राणाने या वनडे मालिकेत 27.66 च्या सरासरीने 83 धाव केल्या. त्याने या मालिकेत रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजापेक्षा चांगली कामगिरी केली. गोलंदाजीत त्याने एकूण 6 विकेट काढल्या. त्याची ही कामगिरी पाहता पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत त्याची निवड पक्की मानली जात आहे.
