
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सोमवारी 4 ऑगस्टला गस एटकीन्सन याला बोल्ड करताच साऱ्या स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. क्रिकेट चाहत्यांनी एकच जल्लोष केला. भारतीय खेळाडूंनी एकमेकांना मीठी मारली. क्रिकेट चाहत्यांनी जागेवर राहत भारतीय संघातील खेळाडूंचं अभिनंदन केलं. ड्रेसिंग रुममध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर कायम गंभीर मुद्रेत असतात. मात्र गंभीरही हसू लागले. भारताने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर मात करत मालिका बरोबरीत सोडवल्याने हा सर्व आनंद पाहायला मिळाला. टीम इंडिया या सामन्यात पछाडली होती. मात्र भारताने जोरदार कमबॅक केलं आणि विजय साकारला.
या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावरुन आजी माजी खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांनी भारताचं अभिनंदन केलं. तसेच गंभीरने या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. गंभीरने दिलेल्या प्रतिक्रियेत या साऱ्या मालिकेचा सार आहे. गंभीरने एक्स पोस्टद्वारे नक्की काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊयात.
भारताने इंग्लंडचा थरारक झालेल्या पाचव्या सामन्यात इंग्लंडचा 6 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांची मालिका यशस्वीरित्या 2-2 ने बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाचा हा पाचव्या सामन्यातील विजय हेड कोच गंभीरसाठी फार महत्त्वाचा ठरला. गंभीरच्या मार्गदर्शनात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा अपवाद वगळता भारताला काही खास करता आलं नाही. त्यामुळे गंभीर निशाण्यावर होता. मात्र ही मालिका बरोबरीत सोडवल्याने गंभीरला दिलासा मिळाला असेल, म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
टीम इंडियाने या मालिकेत अनेक अडचणींवर मात करत इंग्लंडला जशास तसं उत्तर दिलं. त्यामुळे इंग्लंडला मालिका जिंकता आली नाही. कर्णधार शुबमन गिल याची ही पहिलीच मालिका होती. मात्र टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने इंग्लंड दौऱ्याचं आव्हान सार्थपणे पेललं आणि इंग्लंडला बरोबरीत रोखलं. या विजयानंतर गंभीरने पोस्टमध्ये काय काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
गंभीरची एक्स पोस्ट
We’ll win some, we’ll lose some…. but we’ll NEVER surrender! 🇮🇳 Well done boys! pic.twitter.com/lZ5pk4C4A5
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 4, 2025
आम्ही कधी जिंकू, कधी हारु, मात्र आम्ही कधीही आत्मसमर्पण करणार नाही. शाब्बास पोरांनो”, अशा शब्दात गंभीरने भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं.