
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेत खेळू शकणार की नाही? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. बीसीसीआय निवड समितीने 18 जानेवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. त्या संघात बुमराहचा समावेश करण्यात आला. मात्र बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात दुखापत झाली. बुमराहला त्यामुळे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. आता अवघ्या काही तासात बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी फिट आहे की नाही? हे ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही तास टीम इंडियासाठी पर्यायाने भारतीय चाहत्यांसाठी महत्त्वाचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार की नाही? बीसीसीआय याबाबतचा अंतिम निर्णय आज 11 फेब्रुवारीला घेणार आहे. नियमांनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणाऱ्या खेळाडूंची नावं देण्याची 11 फेब्रुवारीला अंतिम मुदत आहे. त्यामुळे 11 तारीख फार महत्त्वाची आहे. बुमराहने नुकतंच बंगळुरुत बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये पाठीवर झालेल्या दुखापतीबाबत जाणून घेण्यासाठी चाचणी केली होती. आता बीसीसीआयचं वैद्यकीय पथक टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीला बुमराहचा रिपोर्ट देणार आहे. त्यानंतर बुमराहबाबत निर्णय घेतला जाईल.
“बुमराहला 5 आठवडे विश्रांती करण्यासाठी सांगितलं आहे. बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी उपलब्ध नसेल”, अशी माहिती बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी 18 जानेवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना दिली होती. मात्र त्यानंतर बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला. त्यामुळे आता बुमराहबाबत काय निर्णय होतो? याबाबत क्रिकेट चाहत्यांना धाकधूक लागून आहे.
दरम्यान टीम इंडिया 20 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे.टीम इंडियासह बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझालंडचा समावेश आहे. टीम इंडिया सलामीचा सामना हा 20 फेब्रुवारीला खेळणार आहे. तर 23 फेब्रुवारीला इंडिया-पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. तसेच 2 मार्चला इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना रंगणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.