Ravi Bishnoi : त्यांना वाटेल तेव्हा…, रवी बिश्नोई रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत स्पष्ट म्हणाला

Rohit Sharma and Virat Kohli Retirement : रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय क्रिकेट संघाच्या अनुभवी जोडीने टी 20i नंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केला. यावरुन भारताचा लेग स्पिनर रवी बिश्नोई याने काय म्हटलं? जाणून घ्या.

Ravi Bishnoi : त्यांना वाटेल तेव्हा..., रवी बिश्नोई रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत स्पष्ट म्हणाला
Ravi Bishnoi and Arshdeep Singh
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 01, 2025 | 7:27 PM

रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय संघाच्या या अनुभवी जोडीने टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृ्त्ती जाहीर केली. दोघांनीही एकाएकी या दोन्ही फॉर्मेटला अलविदा केला. या जोडीच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना झटका लागला. रोहित आणि विराट या दोघांनी भारताला 2024 साली वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर जून महिन्यात इंग्लंड दौऱ्याआधी या दोघांनी कसोटी क्रिकेटला रामराम केला. दोघांच्या निवृत्तीची चर्चा अजूनही पाहायला मिळतेय. बीसीसीआयने या 2 दिग्गजांना सन्मानाने निरोप द्यायला हवा होता, असं मत चाहत्यांनी व्यक्त केलं. या दोघांच्या निवृत्तीवरुन आता भारताचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोई याने भाष्य केलं आहे.

रवी बिश्नोईची रोहित-विराटच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया

“विराट आणि रोहितने निवृत्त होणं हे झटक्यासारखं होतं. अनेकांची या दोघांना मैदानातून निवृत्त होताना पाहायची इच्छा होती. हे दोघे महान खेळाडू आहेत. ते मैदानातून निवृत्त झाले असते तर चांगलं वाटलं असतं. त्या दोघांनी भारतासाठी खूप काही केलं आहे. माझ्या नजरेत त्या दोघांच्या आसपासही कुणी नाही”, असं रवी बिश्नोई याने गेम चेंजर्स या पॉडकास्टमध्ये म्हटलं.

रोहित आणि विराट हे दोघे आता वनडे फॉर्मेटमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे या दोघांना वनडे फॉर्मेटमध्ये मैदानातून निरोप मिळेल, अशी आशा रवीने या दरम्यान बोलताना व्यक्त केली.

“रोहित आणि विराटला चांगल्या पद्धतीने निरोप मिळावा असं अपेक्षित आहे. या दोघांना वनडे क्रिकेटमधून हा निरोप दिला जाऊ शकतो. त्यांना वाटेल तेव्हा ते जाऊ शकतात. त्यांना निवृत्तीसाठी कुणीही सांगू शकत नाही. त्यांचं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं माझ्यासाठी शॉकिंग होतं. त्यांची जागा कोण घेईल हे माहित नाही”, असंही रवीने नमूद केलं.

टीम इंडियाचं मिशन आशिया कप 2025

दरम्यान टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेचं आयोजन हे यूएईएमध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडिया 4 सप्टेंबरला यूएईसाठी रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर भारतीय संघ या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. रवी बिश्नोईची या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. रवीने भारताचं 42 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना 61 विकेट्स मिळवल्या आहेत.