Asia Cup 2025 स्पर्धेच्या सुरुवातीआधीच मोठा बदल, टीम इंडियावर होणार परिणाम!
Asia Cup 2025 Matches Time : आशिया कप स्पर्धेआधीच सामन्यांच्या वेळात बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. एकाएकी सामन्यांच्या वेळात बदल करण्यामागे नक्की कारण काय आहे? जाणून घ्या.

आशिया कप 2025 स्पर्धेला आता मोजून 10 दिवसांचा कालावधी बाकी आहे. आशिया कप स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 पैकी यजमान यूएईचा अपवाद वगळता इतर 7 संघांची घोषणा करण्यात आली आहे. यूएईमधील अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियम आणि दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान एकूण 19 सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आशिया कप स्पर्धेच्या सामन्यांच्या वेळात बदल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार या स्पर्धेतील सामन्यांना 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार होती. मात्र आता सर्व सामन्यांना रात्री 8 वाजता सुरुवात होणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. यूएईमधील हवानामाचा विचार करता सामन्याच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलंय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएईत आशिया कप सामन्यांना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सुरुवात होणार होती. मात्र यूएईतील दमट वातावरण पाहता आयोजकांनी सामन्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसेच ब्रॉडकास्टर्सने वेळेत बदल करण्याबाबतची विनंती केली होती. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
8 संघ 2 गटात
एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदने या स्पर्धेतील 8 सहभागी संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागलं आहे. बी ग्रुपमध्ये हाँगकाँग, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका आहे. तर पाकिस्तान, भारत, यूएई आणि ओमानचा ए ग्रुपमध्ये समावेश आहे.
9 सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात
आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बी ग्रुपमधील अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग आमनेसामने असणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ आशिया कप मोहीमेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला खेळणार आहे. भारतीय संघ पहिल्या सामन्यात यूएई विरुद्ध भिडणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
14 सप्टेंबरला महामुकाबला
दरम्यान क्रिकेट चाहत्यांना आशिया कप स्पर्धेपेक्षा भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची अधिक प्रतिक्षा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याला तीव्र विरोध केला जात होता. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या परवानगीनंतर हा सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 14 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण मैदान मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
