Special Report: जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू, श्रीमंत क्रिकेट बोर्ड, तरी विश्वचषकातून भारत बाहेर, नेमकी माशी कुठे शिंकली?

| Updated on: Nov 07, 2021 | 7:36 PM

न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. पाकिस्तानने आधीच प्रवेश मिळवल्याने भारतीय संघ असणाऱ्या ग्रुपमधून दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. ज्यामुळे भारताचं यंदाच्या विश्वचषकाचं स्वप्न तुटलं आहे.

Special Report: जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू, श्रीमंत क्रिकेट बोर्ड, तरी विश्वचषकातून भारत बाहेर, नेमकी माशी कुठे शिंकली?
भारतीय क्रिकेट संघ
Follow us on

मुंबई: भारतात ‘क्रिकेट’ हा फक्त खेळ नसून ‘भावना’ आहे. कोट्यवधी भारतीयांची मनं, संवेदना जोडल्या गेलेल्या या खेळातील एक पराभवही सर्वांच्या जिव्हारी लागतो. त्यात विश्वचषकासारख्या स्पर्धांमध्येतर भारतीय संघ जणू एखाद्या लढाईवर असल्याप्रमाणे देशात वातावरण असतं. यंदाच्या विश्वचषकातही (T20 World Cup 2021) तसंच वातावरण होतं. त्यात पहिलाच सामना भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताविरुद्ध तब्बल 10 विकेट्सनी पराभूत झाला. ज्यानंतर पुन्हा स्पर्धेत पुनरागमन करणं कठीणचं होतं. अशावेळी इतरांच्या विजय आणि पराभवांवर भारताचा खेळ अवलंबून होता. जो आज न्यूझीलंडच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयासह संपुष्टात आला आणि भारताचा स्पर्धेतील प्रवास इथेच संपला…

भारतीय क्रिकेट संघाचा विचार करता एकेकाळी अगदी नवखा असणारा संघ 1983 चा विश्वचषक जिंकला आणि एक ‘क्रिकेटक्रांतीच’ देशात घडली. पुढील काही वर्षात भारताचा संघ जगातील अव्वल संघामध्ये गणला जाऊ लागला. जगातील सर्वात महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा देश म्हणून साऱ्या क्रिकेट जगतात भारताला मान मिळू लागला. पण असे असतानाही दर काही वर्षांनी भारतीय संघाचा वाईट काळ येतचं होता. तसाच वाईट काळ सध्याही आला आहे का? असा प्रश्न यंदाच्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर येत आहे. कारण सध्या भारतीय संघात जगातील अव्वल दर्जाचे फलंदाज, गोलंदाजच नाही तर उत्तम असे अष्टपैलू खेळाडूही आहे. जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सपैकी एक भारताचा क्रिकेट बोर्ड अर्थात BCCI आहे. असे असतानाही भारताला विश्वचषकात सेमीफायनलपर्यंतही पोहोचता येत नसल्याने नेमकी चूक कुठे होतेय हे संघ व्यवस्थापनाला विचार करण्याची वेळ आली आहे.

आयपीएलचा ओव्हरडोस होतोय का?

क्रिकेट जगतात टी20 क्रिकेटला घेऊन सुरुवातीला काहींचा विरोध होता. पण नंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून टी20 क्रिकेटच सर्वाधिक खेळवलं जाऊ लागला. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांसह आयपीएलसारख्या लीग जन्माला आल्या. ज्यात विविध देशांतील खेळाडू एकत्र येऊन विविध संघातून खेळू लागले. पण या सर्व लीगमध्ये भारताची इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL हीच सर्वात प्रसिद्ध आहे. पण याच लीगमुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय खेळावर परिणाम होत असल्याचेही अनेकांचे म्हणने आहे. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंना बराच वेळ द्यावा लागतो. वर्षातील बरेच महिने यात जात असल्याने इतर प्रकारचे क्रिकेट आणि संघासोबतचा खेळ आपोआपच कमजोर होत आहे.

त्यात कोरोनाच्या संकटानंतर झालेल्या दोन्ही आयपीएलमध्ये बायो-बबलसारख्या नियमांमुळे खेळाडूंचे आणखीच हाल झाल्याचेही समोर आले आहे. तसंच खेळाडूंना आय़पीएलमध्ये दुखापतींमुळे नंतर विश्वचषक किंवा इतर महत्त्वाच्या दौऱ्यात खेळता न आल्याच्याही घटना समोर येत आहेत. यंदा आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाआधी इंग्लंडच्या दौऱ्याचं वेळापत्रकात कोरोनाच्या शिरकावामुळे काही बदल होत असताना थेट दौऱ्यातील शेवटचा सामनात रद्द करण्यात आला. ज्यावेळी देखील आयपीएलवर खूप टीका झाली होती. ज्यानंतर आता विश्वचषकातील खराब कामगिरीलाही आयपीएलचे वरील काही मुद्दे कारणीभूत असल्याच्या टीका होत आहेत.

नेतृत्त्वाची कमतरता?

यंदाच्या विश्वचषकापूर्वीच भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) स्पर्धेनंतर टी20 संघाचा कर्णधार राहणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण या निर्णय़ानंतरही त्याने स्पर्धेत पूर्ण जीव ओतून कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. पाकविरुद्ध एकहाती अर्धशतक विराटनेच लगावलं होतं. पण तरी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून तो काही अपेक्षा पूर्ण करत नसल्याचं वारंवार दिसून येत आहे. मग ते संघनिवड असो किंवा संपूर्ण फलंदाजीचा भार स्वत:वर उचलणं असो काही गोष्टीत विराट कमी पडत आहे. उदाहरणार्थ भारताला कायम मात देणारा न्यूझीलंडचा विचार करता त्यांची फलंदाजी संपूर्णपणे एका खेळाडूवर अवंलंबून असते तो म्हणजे कर्णधार केन विल्यमसन. कोणताही क्रिकेट प्रकार असला तरी केन संघासाठी शेवटपर्यंत उभा असल्चाचं दिसून येतं. पाकलाही बऱ्याच वर्षानंतर बाबर आजमच्या रुपात असा विश्वासू कर्णधार भेटला आहे. पण भारताचा कर्णधार विराट जगातील अव्वल फलंदाज असला तरी अलीकडे त्याच्यावर संघाला अवंलबून राहता येत नाही.

संघ निवडताना चूका?

यंदाचा विश्वचषकात सामन्यांमध्ये खेळण्यापेक्षा भारताला संघ निवडणं हे मोठं आव्हान होतं. याचं कारण अलीकडच्या वर्षात भारतात अनेक नवे चेहरे समोर आले आहेत. त्यामुळे नेमकी कोणाला संधी द्यायची? हा प्रश्न निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन यांच्याकडे होता. ज्याचं योग्य उत्तर मिळवण्यात संघ कुठेतरी कमी पडला. ज्यामधील सर्वात मोठी चूक म्हणजे अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलला संघाबाहेर ठेवण्यात आलं. युएईच्या मैदानावर सर्वात यशस्वी गोलंदाज असणारा चहल टी20 प्रकारात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय फिरकीपटू आहे. असे असतानाही त्याच्या जागी नवख्या राहुल चाहरला संधी देण्यात आली. राहुल खास कामगिरी करु शकला नाही. ज्यामुळे चहलला न घेतल्याने भारताला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर हार्दीकला देण्यात आलेल्या बऱ्याच संधीही भारतासाठी कुठेतरी चूक ठरल्याचं दिसून येत आहे. कारण हार्दीक गोलंदाजी करत नसतानाही त्याला एक फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं. तो फलंदाज म्हणून खास कामगिरी करु शकला नाहीच. उलट त्याच्या संघात असण्याने एक सहावा गोलंदाज भारताला खेळवता आला नाही. ज्यामुळे पहिल्या सामन्यात भारताला एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे संघ निवडतानाच्या चूकाही भारताच्या विश्वचषकातील अपयशामागे कारणीभूत आहेत.

आत्मचिंतन गरजेचं!

तर अशा काही चूकांमुळे भारत यंदाच्या विश्वचषकात खास कामगिरी करु शकला नाही. पण शेवटी खेळ म्हटलंकी हार-जीत आलीच. त्यामुळे भारतीय संघानं सध्यातरी निराश न होता, आगामी सामन्यांची तयारी करणं गरजेचं आहे. कारण पराभव किंवा अपयशानंतर आत्मचिंतन हे एकच असं साधन आहे, जे तुम्हाला निराशेतून आशेकडे घेऊन जाऊ शकतं. त्यात भारताला लवकर या पराभवातून बाहेर पडण्याची गरज आहे. कारण  इकडे विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्वात पहिलाच दौरा न्यूझीलंड विरुद्ध असून दरवेळेच्या पराभवांचा बदला घेऊन विजय कसा मिळवता येईल हे भारताला पाहावं लागेल. तसंच पुढील टी20 विश्वचषकही अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपला आहे. ऑक्टोबर 2022 ला विश्वचषक असल्याने भारताला त्यापूर्वी वरील सर्व चूका टाळून एका तगड्या संघासह स्पर्धेसाठी तयार व्हायचं आहे आणि सर्वात पहिला टी20 विश्वचषक जिंकवून देणारा ‘इंडिया क्या चीज है!’ हे सर्वांना दाखवून द्यायचं आहे.

हे ही वाचा

न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 सीरीजमध्ये आयपीएलमधील ‘या’ 5 युवांचे तारे चमकणार, BCCI देणार संधी!

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी, गोलंदाजी प्रशिक्षक खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज, म्हणाले…