
उपकर्णधार स्मृती मंधाना हीने टीम इंडियाला वूमन्स वर्ल्ड कप जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. या ऐतिहासिक विजयानंतर स्मृती मंधाना पलाश मुच्छल याच्यासह नव्या इनिंगसाठी तयार झाली होती. स्मृतीने टीम इंडियातील आपल्या सहकाऱ्यांसह ‘समजो हो ही गया’ या गाण्यावर डान्स करत साखरपुडा झाल्याचंही अप्रत्यक्ष जाहीर केलं. त्यानंतर सांगलीत स्मृतीच्या लग्नासाठी घरं सजलं होतं. मंडप घालण्यात आला होता. महिला संघातील खेळाडू स्मृतीच्या लग्नाधीच सांगलीत दाखल झाल्या होत्या. लग्नाची सर्व तयारी झाली होती. मात्र काही तास बाकी असताना स्मृतीच्या लग्नात विघ्न आलं.
स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर काही दिवसांनी पलाश याच्या प्रकृतीत बिघाड झाला. स्मृतीवर एकामोगामाग एक संकटं आली. त्यामुळे स्मृतीचं लग्न लांबणीवर पडलं. स्मृतीचं लग्न स्थगित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर बऱ्याच खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या. त्यामुळे नक्की काय खरं आणि काय खोटं? हे चाहत्यांना स्मृतीकडूनच जाणून घ्यायचं होतं. अखेर स्मृतीने लग्न लांबणीवर पडल्यानंतर अनेक दिवसांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.
स्मृतीने जवळपास 12 दिवसांनी इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केलाय. स्मृतीने या व्हीडिओत लग्नाबाबत काहीही माहिती दिलेली नाही. मात्र स्मृतीने वनडे वर्ल्ड कप फायनलमधील अनुभवांबाबत भाष्य केलं आहे. टीम इंडियाने 2 नोव्हेंबरला हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.
गेल्या 12 वर्षांत वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर आपण कधी जिंकू शकतो का? याबाबत विचार करायचे, असं स्मृतीने म्हटलं. तर आता स्मृतीला वर्ल्ड कप विजयानंतर लहान बाळाप्रमाणे आनंद झाला आहे.
स्मृतीने सोशल माीडियावर पोस्ट केलेल्या व्हीडिओतून अंतिम सामन्यातील आठवणींना उजाळा दिला. टीममधील खेळाडू गरजेनुसार कामगिरी करत होते. त्यामुळे बॅटिंग दरम्यान काही विचार करण्याची गरज नव्हती. मात्र मी फिल्डिंग दरम्यान देवाचं नामस्मरण करत होते, असं स्मृतीने सांगितलं.
स्मृतीने काय म्हटलं?
“मी फिल्डिंग दरम्यान सर्व देवांचं नामस्मरण केलं. संपूर्ण 300 बॉलपर्यंत मी नामस्मरण आणि प्रार्थना करत होते की या विकेट्स मिळवून द्या”, असं स्मृती मंधाना हीने म्हटलं.