
भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. लग्नसोहळ्यासाठी सांगलीत दिग्गज क्रिकेटपटूंचा मेळा जमला आहे. वनडे वर्ल्डकप नुकताच जिंकल्याने या सोहळ्याची रंगत वाढली आहे. भारतीय वुमन्स क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू लग्नसोहळ्यासाठी सांगलीत दाखल झाले आहेत. स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा २३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यापूर्वी हळदीच्या कार्यक्रमाची रंगत सुरु आहे. स्मृती मंधानाच्या लग्नाच्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सहकारी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. या आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले जात आहेत. स्मृती मंधानाच्या हळदीच्या कार्यक्रमात भारतीय महिला संघाच्या सहकाऱ्यांनी केलेल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहेत. चाहत्यांनी या व्हिडीओंना पसंती दिली आहे. तसेच कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सांगली हे स्मृती मंधानाचं माहेर आहे आणि येथेच लग्नसोहळा पार पडणार आहे. स्मृती मंधानाच्या घरी जेमिमा रॉड्रिग्स, रेणुका सिंह, अरुंधती रेड्डी, शफाली वर्मा, राधा यादव यांच्यासह स्टार क्रिकेटपटू आल्या आहेत. लग्नसोहळ्यापूर्वी हळदीच्या कार्यक्रमात यांनी रंगत आणली. 21 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी झालेल्या हळदी समारंभात सर्वजण सुंदर पिवळ्या पोशाखात दिसले. एकत्र येऊन त्यांच्या नृत्याने हळदी सोहळा आणखी खास बनवला. नवऱ्या स्मृती मंधानासोबत डान्सही केला. हा लग्नसोहळा स्मरणात राहवा यासाठी कोणतीही कसर या खेळाडूंनी सोडली नाही. टीम इंडियाचे चाहते या लग्नसोहळ्यातील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी आतुर आहेत.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या नात्याबाबत चर्चाही रंगल्या होत्या. पण त्यांनी त्यावेळेस कोणालाही काहीही कळू दिलं नव्हतं. पण २ नोव्हेंबरला भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं आणि त्यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं. कारण या दिवसाचं औचित्य साधत पलाशने डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्मृतीच्या बोटात अंगठी घालून लग्नाची मागणी घातली. त्याला स्मृतीनेही होकार दिला.