
क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20i सामन्याची प्रतिक्षा आहे. उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 17 डिसेंबरला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान आहे. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी या सामन्याआधी कसून सराव केला आहे.
टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं होतं. भारताने तिसरा सामना हा एकतर्फी फरकाने जिंकला. आता टीम इंडिया चौथ्या सामन्यात कोणत्या प्लेइंग ईलेव्हनसह उतरणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाची लकी जोडी खेळणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती ही टीम इंडियाची लकी जोडी आहे.
कुलदीप आणि वरुण प्लेइंग ईलेव्हनमध्ये असताना टीम इंडियाने बहुतांश सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियासाठी ही जोडी लकी असल्याचं म्हटल्यास चूक ठरणार नाही. हे दोघे प्लेइंग ईलेव्हनमध्ये असताना भारताचा 8 पैकी 7 सामन्यांत विजय झाला आहे.
तसेच कुलदीप आणि वरुण या जोडीनेच भारताला धर्मशालेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी 20i सामन्यात विजयी करण्यात योगदान दिलं होतं. त्यामुळे हे दोघे लखनौतील चौथ्या सामन्यात खेळणार, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
टीम इंडियाने आतापर्यंत लखनौत 3 टी 20i सामने खेळले आहेत. भारताने या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाला लखनौत विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तसेच या 3 पैकी 2 सामन्यांमध्ये कुलदीप यादव याने 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर वरुणला संधी मिळाल्यास त्याचा हा लखनौतील पहिला टी 20i सामना ठरेल.
दरम्यान लखनौत विजयी मिळवल्यास भारताचा हा सलग 14 वा मालिका विजय ठरेल. तर दक्षिण आफ्रिकेचा हा 29 सामन्यांमधील 19 वा पराभव ठरेल. त्यामुळे लखनौत कोण जिंकणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.