Varun Chakravarthy याची ऐतिहासिक कामगिरी, टी 20i मध्ये असा विक्रम करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
Varun Chakravarthy Icc T20i Ranking : वरुण चक्रवर्ती याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. आयसीसीने वरुणला त्याच्या या कामगिरीचं मोठं गिफ्ट दिलं आहे.

मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखला जाणारा टीम इंडियाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने टी 20i क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. वरुण टी 20i बॉलर्स रँकिंगमध्ये आधीपासूनच पहिल्या स्थानी विराजमान होता. आता आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत वरुणला तगडा फायदा झाला आहे. वरुणने त्याचं अव्वल स्थान आणखी भक्कम केलंय. तसेच वरुणची त्याच्या कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. विशेष बाब म्हणजे वरुण टी 20i क्रिकेटमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. वरुणने जे करुन दाखवलंय ते आतापर्यंत जसप्रीत बुमराह या भारताच्या प्रमुख गोलंदाजालाही जमलं नाही.
वरुणचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विकेट्सचा ‘सिक्स’
टीम इंडिया सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. वरुणला त्याने या मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे टी 20i रँकिंगमध्ये हा तगडा फायदा झाला आहे. वरुणने या 3 सामन्यांमध्ये एकूण 6 विकेट्स घेतल्या आहेत. वरुणने कटकमधील पहिल्या सामान्यात अवघ्या 19 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. वरुणने दुसऱ्या टी 20i सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच वरुणने 14 डिसेंबरला तिसऱ्या सामन्यात 11 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या होत्या. वरुणने त्याच्या या सातत्यपूर्ण आणि चमकदार कामगिरीच्या जोरावर रँकिंगमध्ये ठसा उमटवला आहे.
ताज्या आकडेवारीनुसार वरुणच्या खात्यात एकूण 818 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा जेकब डफी विराजमान आहे. वरुण आणि जेकब यांच्यात 119 रेटिंगचा फरक आहे. जेकबच्या नावावर 699 रेटिंग पॉइंट्स आहेत. या आकड्यांवरुन टीम इंडियाचा हा मिस्ट्री स्पिनर किती सरस आहे, हे स्पष्ट होतं.
वरुण चक्रवर्ती याची 2025 मधील कामगिरी
वरुणने 2025 या वर्षात फिरकीच्या जोरावर अफलातून कामगिरी केली आहे. वरुणने टीम इंडियाला काही सामन्यांमध्ये एकहाती विजय मिळवून दिला आहेत. वरुणने 2025 या वर्षात आतापर्यंत 19 सामन्यांमध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत. वरुणने या दरम्यान 6.69 च्या इकॉनमी रेटने धावा दिल्या आहेत.
वरुणची कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी
A career-best rating for a key India spinner as the side primes for their #T20WorldCup defence 👊
More 👇https://t.co/M4Wjtlg3LT
— ICC (@ICC) December 17, 2025
वरुण चक्रवर्ती याची टी 20i कारकीर्द
दरम्यान वरुण चक्रवर्ती याने आतापर्यंत टीम इंडियाचं 32 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. वरुणने 30 डावांत 15 च्या सरासरीने 51 विकेट्स घेतल्या आहेत. वरुणने 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
