टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी नव्या जर्सीचं अनावरण, रोहित शर्मा स्पष्टच म्हणाला की…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या दोन महिन्यांचा अवधी शिल्लक राहीला आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. आता टीम इंडियाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंका या देशाकडे आहेत. या स्पर्धेत पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार असून त्या स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे. पाच संघांचा एक गट तयार केला असून एकूण चार गट तयार केले आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, नेदरलँड्स, नामिबिया, अमेरिका हे संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत दोन्ही संघ भिडणार यात काही शंका नाही. असं असताना या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. भारत दक्षिण अफ्रिका वनडे सामन्यातील पहिला डाव संपल्यानंतर जर्सीचं अनावरण करण्यात आलं.
भारताच्या जर्सीवर 2 स्टार का?
टीम इंडियाच्या टी20 वर्ल्डकप 2026 च्या जर्सीची कॉलर तिरंगी रंगात आहे. पुढच्या बाजूला गडद निळ्या रंगाचे पट्टे असतील. देशाचं नाव भगव्या रंगात मध्यभागी आहे. तर हातांच्या खाली भगवा पट्टा आहे. तर खांद्यावर पांढरे तीन आडवे पट्टे दिले आहेत. समोरील बाजूस हलके आणि गडद निळे पट्टे स्पष्टपणे दिसतात. टीम इंडियाच्या जर्सीवर 2 स्टार आहे. हे स्टार भारताने दोनदा टी20 वर्ल्डकप जिंकल्याचं प्रतिनिधित्व करतात. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या हस्ते या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उपस्थितीत अनावरण करण्यात आलं.
‼️ Rohit Sharma unveils the jersey for T20 World Cup 2026 ‼️ #INDvsSA #RohitSharma #ViratKohli𓃵 pic.twitter.com/G3Zj3vf3hy
— Rocket Singh (@rocketSahab) December 3, 2025
काय म्हणाला रोहित शर्मा?
जर्सीचं अनावरण करताना रोहित शर्मा म्हणाला की, “हा एक लांब प्रवास होता. आम्ही 2007 मध्ये पहिला वर्ल्डकप जिंकला आणि पुढचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी आम्हाला 15 वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. हा एक लांब प्रवास होता आणि यात अनेक चढ-उतार होते. पण पुन्हा ट्रॉफी उचलणे खूप छान वाटले. आता, भारतात विश्वचषक होत असल्याने ही एक रोमांचक स्पर्धा असणार आहे. माझ्या शुभेच्छा नेहमीच संघासोबत आहेत आणि मला खात्री आहे की प्रत्येकजण त्यांच्या मागे असेल. त्यांना पाठिंबा देईल आणि संघ त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करेल.”
