आशिया कप ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि मोहसिन नकवी येणार आमनेसामने! एका वर्षानंतर मैदानात तसंच घडणार?
वुमन्स टी20 आशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 28 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पण या स्पर्धेच्या अंतिम फेरीत काय चित्र असेल? असा प्रश्न आतापासूनच विचारला जात आहे. बीसीसीआय आणि मोहसिन नकवी पुन्हा आमनेसामने येणार का?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षांपासून संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. राजकीय, मनोरंजन अशा सर्वच स्तरावर त्याचे परिणाम दिसून आले आहेत. यात क्रीडाविश्व काही मागे राहिलं नाही. पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचे परिणाम क्रिकेटच्या मैदानातही दिसले. मागच्या वर्षी आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानची मैदानात पुरती लाज काढली. पहिल्या सामन्यापासून नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. तर अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट काउसिंलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर नकवी ट्रॉफी घेऊन फरार झाला. आता वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत तसंच काहीसं होण्याची शक्यता वाढली आहे.
वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धा
वुमन्स आशिया कप स्पर्धेला 28 ऑगस्टपासून सुरूवात होणार असून यजमानपद युएईकडे आहे. या स्पर्धेत भारतासह एकूण 8 संघ भाग घेणार आहेत. पण खऱ्या अर्थाने जेतेपदाची स्पर्धा भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या संघात असणार आहे. असं असताना जेतेपदासाठी भारतीय प्रबळ दावेदार मानला जात आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ अंतिम फेरी गाठेल असंच चित्र दिसत आहे. त्यात भारत पाकिस्तान संघ एकाच गटात असल्याने आमनेसामने येणार आहे. अशा स्थितीत नो हँडशेक पॉलिसी आणि अंतिम सामना जिंकल्यानंतर ट्रॉफी मोहसिन नकवीच्या हातून घ्यायची की नाही असा प्रश्न आहे. दरम्यान, 5 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे.
मेन्स आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत घडलं तसंच घडणार का? भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानला धोबीपछाड दिला. पण भारतीय संघाने मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. तर नकवीही त्यांच्याच हातून देणार यावर अडून राहिला. पण भारतीय संघ ठाम असल्याचं पाहून ट्रॉफी घेऊन पळ काढला. अद्याप ही ट्रॉफी भारतीय संघाला मिळालेली नाही. आता पु्न्हा वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने असा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत बीसीसीआय काय पावलं उचलणार याकडे लक्ष लागून आहे.
