
आयपीएल 2026 स्पर्धेची आतापासूनच जोरदार चर्चा रंगली आहे. कारण फ्रेंचायझींनी आपल्या संघासाठी आवश्यक असलेल्या खेळाडूंची जमवाजमव सुरु केली आहे. फ्रेंचायझींना रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजेपर्यंत सोपवायची आहे. यानंतर फ्रेंचायझी नोंदणीकृती खेळाडूंची यादी पाठवेल. यातून सर्व फ्रेंचायझी खेळाडूंना शॉर्टलिस्ट करतील आणि त्यानंतर लिलावाची रूपरेषा ठरेल. ट्रेड विंडो ऑक्शनच्या एक आठवड्यापर्यंत सुरू असेल. त्यानंतर मात्र खेळाडूंसाठी ट्रेड करता येणार नाही. पण मिनी लिलाव होणार कधी? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
16 डिसेंबरला अबूधाबीत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडेल. सलग तिसऱ्या वर्षी आयपीएलची लिलाव प्रक्रिया विदेशात होणार आहे. आयपीएल 2024 लिलाव पहिल्यांदा दुबईत झाला होता. त्यानंतर 2025 मध्ये मेगा लिलाव प्रक्रिया सौदी अरबच्या जेद्दाहमध्ये पार पडली होती. आता दुबईमध्ये दुसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएल लिलाव झाल्यानंतर स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिन्या आधीपर्यंत ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करता येईल. पण मिनी लिलाव 2026 मध्ये घेतलेल्या खेळाडूंची ट्रेड करता येणार नाही.
आयपीएल रिटेन्शन यादी जाहीर करण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने दोन खेळाडूंची यशस्वी डील केली आहे. मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट्सकडून शार्दुल ठाकुर आणि गुजरात टायटन्सकडून रूदरफोर्डला संघात घेतलं आहे. शार्दुल ठाकुरसाठी 2 कोटी, तर रूदरफोर्डसाठी 2.6 कोटी रुपये मोजले आहे. आता मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिलीज करते याची उत्सुकता लागून आहे. कारण मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने जवळपास सर्वच पैसे खर्च केले होते आणि पर्समध्ये फक्त 17 लाख होते. आता दोन खेळाडू घेतल्याने कोणाचा नंबर लागतो याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
मागच्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे त्या फ्रेंचायझीच्या रणनितीकडेही लक्ष असणार आहे. कोणत्या खेळाडूंवर बाजी लावणार आणि कोणाला सोडणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल. लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स यांनी एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे या संघांच्या बांधणीकडेही लक्ष असेल.