
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारताने 5 विकेटने शानदार विजय मिळवत आशिया कपचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात तिलक वर्माने नाबाद 69 धावांची खेळी करून सर्वांची मने जिंकली. तिलकने हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात53 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारले. या सामन्यानंतर तिलक वर्मासह भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. तिलक हैदराबादमध्ये पोहोचल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांने पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी अंतिम सामन्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे.
तिलक वर्माने पत्रकारांशी बोलताना म्हटले की, ‘मी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या मताशी सहमत आहे. आता भारत आणि पाकिस्तान मोठे प्रतिस्पर्धी नाहीत. पाकिस्तानचा संघ आमच्या समोर टिकण्याच्या लायकीचा नाही.’ पुढे बोलताना तिलकने म्हटले की, भारत-पाकिस्तान सामन्यात दबाव होता. 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दबाव जाणवत होता, परंतु देशाला विजय मिळवून द्यायचा हा विचार मनात होता. 1.4 अब्ज भारतीयांसाठी सामना जिंकणे ही माझी प्राथमिकता होती.
पाकिस्तानने दिलेल्या 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. भारताची धावसंख्या 2 बाद 10 असताना तिलक फलंदाजीला आला आणि त्यानंतर भारताची धावसंख्या 3 बाद 20 झाली. त्यामुळे भारतावर दबाव निर्माण झाला होता. यावर बोलताना तिलक म्हणाला की, ‘कठीण परिस्थितीत पाकिस्तानी खेळाडू मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.3 विकेट गेल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी आमच्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली होती.’
पुढे बोलताना तिलक म्हणाला की, भारतावर दबाव असताना पाकिस्तानने जोरदार स्लेजिंग केली, परंतु देशाला विजय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यात पडणार नाही हे कदाचित पाकिस्तानला माहिती नव्हते. त्यामुळे आम्ही बॅटने उत्तर दिले. मोदींनी ऑपरेशन सिंदूरसारखे ऑपरेशन टिळक असे नाव दिल्यावर मला खूप आनंद झाला. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे असंही यावेळी तिलकने सांगितले.