
डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग 2026 च्या मोसमासाठी नवी दिल्लीतील जेडब्ल्यू मॅरेट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मेगा ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं. एकूण 5 फ्रँचायजींसह क्रिकेट चाहत्यांना मेगा ऑक्शनची प्रतिक्षा होती. वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी मेगा ऑक्शनसाठी एकूण 277 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. मात्र त्यापैकी 67 खेळाडूच भाग्यवान ठरले. मेगा ऑक्शनमधून 5 फ्रँचायजींनी आपल्या गरजेनुसार खेळाडू घेतले. या 67 खेळाडूंमध्ये 23 विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या 67 खेळाडूंसाठी 5 फ्रँचायजींना 40 कोटी 80 लाख रुपये मोजावे लागले. या निमित्ताने मेगा ऑक्शनमधील सर्वात महागड्या 5 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.
टीम इंडियाची ऑलराउंडर दीप्ती शर्मा ही या मेगा ऑक्शनमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली. दीप्तीची बेस प्राईज ही 50 लाख रुपये होती. दीप्तीला आपल्या गोटात घेण्यासाठी दिल्लीने बोली लावली. मात्र इतर संघांनी रस दाखवला नाही. मात्र त्यानंतर यूपी वॉरियर्सने आरटीएमचा वापर केला. दिल्लीने यूपीसमोर दीप्तीसाठी 3.2 कोटींचा प्रस्ताव ठेवला. यूपीने हा प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे आता दीप्ती यंदाही यूपीकडूनच खेळताना दिसणार आहे.
न्यूझीलंडची ऑलराउंडर अमेलिया केर ही या मेगा ऑक्शनमधील एकूण दुसरी महागडी खेळाडू ठरली. अमेलियासाठी मुंबई इंडियन्सने 3 कोटी रुपये मोजले.
न्यूझीलंडची क्रिकेटर सोफी डीव्हाईन हीला आपल्या गोटात घेण्यासाठी दिल्ली कॅपिट्ल्स आणि आरसीबी यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. त्यानंतर आणखी ट्विस्ट वाढला. गुजरात जायंट्सनेही या दोघांमध्ये सोफीसाठी उडी घेतली. गुजरातला त्यात यशही आलं. गुजरातने सोफीला 2 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.
मेग लेनिंग हीला युपी वॉरियर्सने आपल्या गोटात घेतलं. युपीने मेगसाठी 1 कोटी 90 लाख रुपये मोजले. मेगसाठी दिल्ली कॅपिट्ल्स प्रयत्नशील होती. मेगने दिल्लीला 2 वेळा अंतिम फेरीत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळेच दिल्लीचे मेगसाठी प्रयत्न सुरु होते. मात्र युपीने बाजी मारली.
चिनले हॅन्री या वेस्ट इंडिजच्या स्पिनरसाठी मेगा ऑक्शनमध्ये अनेक फ्रँचायजींमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र दिल्ली कॅपिट्ल्सने चिनलेला घेतलं. दिल्लीने विंडीजच्या या स्पिनरसाठी 1 कोटी 30 लाख रुपये मोजले.