
टीम इंडियाने अवघ्या काही महिन्यांपूर्वी अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत टी 20i आशिया कप 2025 ट्रॉफीवर नाव कोरलं. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. त्यानंतर आता अंडर 19 टीम इंडियाला आशिया कप ट्रॉफी आपल्या नावावर करण्याची संधी आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे समीकरण जुळल्यास सूर्यकुमार यादव याच्यानंतर टीम इंडिया आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात पाकिस्तानला पराभूत करुन अंडर 19 आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरु शकते.
सूर्याच्या नेतृत्वात भारताने 28 सप्टेंबरला पाकिस्तानवर मात करुन आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला होता. तर आता 81 दिवसांनी पुन्हा तो योग जुळून आल्यास आणि विजय मिळवल्यास अंडर 19 टीम इंडिया आशिया चॅम्पियन होईल.
अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनी उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात टीम इंडियासमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि गतविजेता बांगलादेश यांच्यात झुंज पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही सामने एकाच दिवशी 19 डिसेंबरला होणार आहेत.
उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला आणि पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत केल्यास अंतिम फेरीत 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. टीम इंडिया आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत विजय मिळवला तर रविवारी 21 डिसेंबरला महाअंतिम सामन्याचा थरार रंगेल.
उभयसंघात महाअंतिम सामना झाल्यास भारत विरुद्ध पाकिस्तान या दोघांची या स्पर्धेत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ ठरेल. याआधी 14 डिसेंबरला दोन्ही कट्टर संघांमध्ये आमनासामना झाला. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 90 धावांनी एकतर्फी विजय साकारला. टीम इंडियाला त्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 50 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानने भारताला 46.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. त्यामुळे पाकिस्तानला 241 धावांचं आव्हान मिळालं. मात्र भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त पलटवार करत पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. भारताने पाकिस्तानला 150 धावांवर गुंडाळलं आणि 91 धावांनी दणदणीत विजय साकारला. अशात आता क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान महाअंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार की नाही? हे उपांत्य फेरीतील सामन्यांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.