IND vs PAK : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानचा 90 धावांनी धुव्वा उडवत अचूक हिशोब, 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली
India vs Pakistan U19 Match Result : अंडर 19 टीम इंडियाला पाकिस्तान विरूद्धच्या या विजयासाठी तब्बल 5 वर्ष प्रतिक्षा करावी लागली. भारताने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वातमध्ये की कामगिरी केली.

टीम इंडियाने अंडर 19 वनडे आशिया कप 2025 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने यूएईनंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने दुबईतील आयसीसी एकेडमी ग्राउंडवर आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात पाकिस्तानला 90 धावांनी पराभवाची धुळ चारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. पाकिस्तानला पूर्ण 49 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी धारदार बॉलिंगच्या जोरावर पाकिस्तानला 41.2 ओव्हरमध्ये 150 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे सलग दुसरा विजय साकारला.
विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. पाकिस्तानसाठी हुजेफा अहसान याने सर्वाधिक 70 धावा केल्या. अहसानने या खेळीत 2 षटकार आणि 9 चौकार लगावले. कॅप्टन फरहान युसफ याने 23 धावांचं योगदान दिलं. तर ओपनर उस्मान खान याने 16 धावा जोडल्या. त्या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. टीम इंडियासाठी दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. किशन कुमार सिंह याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेर रस्ता दाखवला. तर खिलान पटेल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत पाकिस्तानचं पॅकअप करण्यात योगदान दिलं.
टीम इंडियाची बॅटिंग
त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाच्या आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या स्टार जोडीने निराशा केली. वैभव 5 धावांवर बाद झाला. तर आयुष मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. आयुषने 39 धावांचं योगदान दिलं.
टीम इंडियासाठी या सामन्यात एरॉन जॉर्ज आणि कनिष्क चौहान जोडीने सर्वाधिक धावा केल्या. एरॉनने 85 तर कनिष्कने 46 धावांचं योगदान दिलं. अभिग्यान याने 22 धावा केल्या. तर विहान मल्होत्रा आणि हेनिल पटेल या दोघांनी प्रत्येकी 12-12 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 240 धावांपर्यंत पोहचता आलं. मात्र टीम इंडियालाही 49 ओव्हर खेळता आलं नाही. पाकिस्तानने टीम इंडियाला 46.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. पावसामुळे हा सामना 49 ओव्हरचा करण्यात आला होता.
पाकिस्तानचा हिशोब, 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली
दरम्यान टीम इंडियाने या विजयासह पाकिस्तानचा हिशोब केला. पाकिस्तानने गेल्या वर्षी अंडर 19 आशिया कप स्पर्धेतच पराभूत केलं होतं. भारताने या पराभवाची परतफेड केली. तसेच टीम इंडियाने या विजयासह 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली. अंडर 19 टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध अखेरचा सामना हा 2020 साली जिंकला होता. त्यानंतर पाकिस्तानने सलग 3 सामन्यात भारताला पराभूत केलं होतं.
