U19 टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल, इंग्लंडला 174 धावांवर गुंडाळलं, विजयी सुरुवात करणार का?

England U19 vs India U19 1st Youth ODI : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्याच सामन्यात जबरदस्त बॉलिंग करत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 175 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे.

U19 टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल, इंग्लंडला 174 धावांवर गुंडाळलं, विजयी सुरुवात करणार का?
U19 IND vs ENG 1st Odi
Image Credit source: Sussex Cricket Screenshot
| Updated on: Jun 27, 2025 | 7:26 PM

टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडने टीम इंडियावर सलामीच्या सामन्यात 5 विकेट्सने मात केली. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला अंडर 19 टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून (27) सुरुवात झाली आहे. अंडर 19 टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यात अंडर 19 टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल केली आहे. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडला 50 ओव्हरही खेळता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियाला 175 धावा करुन या मालिकेत विजयी सुरुवात करण्याची संधी आहे.

एंड्रयू फ्लिंटॉफच्या मुलाचं अर्धशतक

भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडला 50 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने इंग्लंडला 42.2 ओव्हरमध्ये 174 रन्सवर ऑलआऊट केलं. इंग्लंडसाठी रॉकी फ्लिंटॉफ याने सर्वाधिक धावा केल्या. रॉकी इंग्लंडचा माजी कर्णधार आणि ऑलराउंडर एंड्रयू फ्लिंटॉफचा मुलगा आहे. रॉकीने अर्धशतकी खेळी केली. रॉकीने 90 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 56 रन्स केल्या. रॉकी व्यतिरिक्त इसाक मोहम्मद यानेही 40 पेक्षा अधिक धावा केल्या. इसाकने 28 बॉलमध्ये 150 च्या स्ट्राईक रेटने 42 रन्स केल्या. इसाकने या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार लगावले.

भारतीय गोलंदाजांची कमाल

ओपनर बीजे डॉकिन्स याने 18 धावा केल्या. बेन मायेसने 16 रन्स केल्या. तर जेम्स मिंटोने 10 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. युद्धजित गुहा आणि वैभव सूर्यवंशी या दोघांना एकही विकेट मिळाली नाही. मात्र इतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. हेनिल पटेल, आरएस अंब्रिश आणि मोहम्मद एनॉन या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या तर कौशिक चौहान याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

वैभव-आयुषकडून मोठी खेळी अपेक्षित

दरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडल्यानंतर आता सर्व मदार भारतीय फलंदाजांवर असणार आहे. मात्र चाहत्यांना कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. वैभव आणि आयुष या युवा जोडीने आयपीएलच्या 18 व्या मोसमातून पदार्पण केलं आणि आपली छाप सोडली. दोघांनीही शानदार कामगिरी करत टीम मॅनेजमेंटचा निर्णय योग्य ठरवला. या दोघांकडून आता इंग्लंड दौऱ्यात तशीच कामगिरी अपेक्षित आहे. त्यामुळे ही स्टार सलामी जोडी टीम इंडियाला कशी सुरुवात मिळून देते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.