
BCCI to Review India U19 Team: 19 वर्षांखालील आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानविरोधात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने 191 धावांच्या मोठ्या फरकाने टीम इंडियाचा पराभव केला. या टुर्नामेंटमध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी बजावली. पण अंतिम सामन्यात संपूर्ण संघच ढेपाळला. या सामन्यातील खेळाडूंची कामगिरी आणि त्यांचे वर्तन यावरुन वाद ओढावला. आता कर्णधार आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी याच्यासह संघातील इतर खेळाडूंवर BCCI मोठ्या कारवाईची शक्यता आहे. या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. बीसीसीआय अंतिम सामन्यात पराभव का झाला, त्यात कुणी सर्वात वाईट कामगिरी बजावली याची समीक्षा करणार असल्याचे समोर येत आहे.
BCCI करेल टीम इंडियाच्या कामगिरीची समीक्षा
क्रिकबजने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, BCCI, भारताच्या 19 वर्षांखालील संघाच्या महापराभवाची समीक्षा करेल. ॲपेक्स परिषदेच्या बैठकीत याविषयीवर चर्चा होणार आहे. संघ व्यवस्थापनाकडून याविषयीचे उत्तर घेतल्या जाईल. संघाचे व्यवस्थापक सलील दातार याविषयीचा अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. याशिवाय BCCI हेड कोच ऋषिकेश कानिटकर आणि कर्णधार आयुष म्हात्रे सोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
खेळाडूंच्या वर्तनावर चर्चा
सर्वसामान्य समीक्षा धोरणापेक्षा बीसीसीआय थोडी कडक भूमिका घेण्याची शक्यता आहे. अखेरच्या सामन्यात खेळाडूंच्या वर्तनाची मोठी चर्चा झाली. पाकिस्तानी संघातील खेळाडूंची शिवीगाळ आणि त्याला भारतीय खेळाडूंनी दिलेले उत्तर, भारतीय खेळाडूंचे वर्तन याची समीक्षा होणार आहे. अर्थात याविषयी काय चर्चा होईल आणि काय कारवाई करण्यात येईल याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जानेवारी -फेब्रुवारी 2026 मध्ये
अंडर 19 वर्ल्ड कपचे आयोजन होणार आहे. या कारणामुळे BCCI या अडचणींवर मात करण्याविषयी विचार करत आहे. आगामी विश्वचषकात या संघाने दमदार कामगिरी करावी यासाठी आताच त्यांच्या कामगिरीची समीक्षा करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने चाहत्यांना निराश केले. त्यातच पाक संघाच्या खेळाडूंशी नाहक हुज्जत घालून मानसिक संतुलन गमाविल्याचे अनेकजणांचे मत आहे. पाक संघातील खेळाडूंची भारतीय खेळाडूंना डिवचन दबावात आणण्याची रणनीती यामुळे यशस्वी ठरल्याचा दावाही काही समीक्ष करत आहेत. त्यादृष्टीने खेळाडूंची मानसिक तयारी करणे अत्यावश्यक झालं आहे.