
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-26 या मोसमात (Vijay Hazare Trophy) मुंबईने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. मुंबई या सामन्यात आतापर्यंत अजिंक्य आहे. मुंबईने शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामात खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. मुंबईने सिक्कीम, उत्तराखंड, छत्तीसगड आणि गोव्याला पराभूत केलं आहे. तर आता मुंबई सलग आणि एकूण पाचव्या विजयसाठी तयार आहे. मुंबई आपल्या पाचव्या सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध खेळणार आहे. महाराष्ट्र टीमचाही हा पाचवा सामना असणार आहे. दोन्ही संघात टीम इंडियासाठी खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच कायमच मुंबई विरुद्ध महाराष्ट्र हा सामना लक्षवेधी राहिला आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट टीमची या हंगामात 50-50 अशी कामगिरी राहिली आहे. महाराष्ट्रने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत, तर तितक्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. आता महाराष्ट्रने शेवटचा सामना जिंकला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विजयरख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र कॅप्टन ऋतुराजसाठी सलग 4 सामने जिंकलेल्या मुंबईला रोखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्र या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मैदान मारणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मुंबई-महाराष्ट्र या सामन्यात ओपनर पृथ्वी शॉ याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात मुंबईकडून केलीय. मात्र पृथ्वी अवघ्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र संघात सामील झाला. पृथ्वी मुंबई टीममधील बहुतांश खेळाडूंसह खेळला आहे. त्यामुळे पृथ्वीला मुंबईतील खेळाडूंची जमेची आणि कमी बाजू माहित आहे. त्यामुळे आता पृथ्वी आपल्या आधीच्या संघाविरुद्ध मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरतो का? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामना शनिवारी 3 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. मात्र हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर दाखवण्यात येणार नाही.
दरम्यान मुंबई सी ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये 16 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर महाराष्ट्र टीम 8 गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे.