
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना सुरु असताना निवड समितीने महत्त्वाच्या स्पर्धेतील बाद फेरीसाठी रविवारी 11 जानेवारीला टीम जाहीर केली आहे. निवड समितीने पुन्हा एकदा कर्णधार बदलला आहे. तसेच काही कॅप्ड खेळाडूंना संघातून मुक्त केलं आहे. निवड समितीकडून संघात कुणाला संधी देण्यात आलीय? तसेच कर्णधार कुणाला करण्यात आलंय? हे सविस्तर जाणून घेऊयात.
एमसीए निवड समितीने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 2025-2026 या मोसमातील उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यासाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मुंबई या सामन्यात प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणार आहे. एमसीएने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
रोहित शर्मा याचा खास सहकारी मित्र आणि सिद्धेश लाड याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शार्दूल ठाकुर याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र श्रेयस न्यूझीलंड विरुद्ध खेळत असल्याने त्याला संघातून मुक्त करण्यात आलंय. अशात आता सिद्धेश लाड याला कर्णधार करण्यात आलं आहे.
श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे शार्दूल ठाकुर याने साखळी फेरीत मुंबईचं नेतृत्व केलं. मात्र शार्दूलला मुंबईच्या साखळी फेरीतील शेवटच्या 2 सामन्यांआधी दुखापत झाली. त्यामुळे दुखापतीनंतर संघात परतलेल्या श्रेयस अय्यर याने साखळी फेरीतील शेवटच्या 2 सामन्यात मुंबईचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर श्रेयसला न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी मुक्त करण्यात आलं. त्यामुळे आता सिद्धेश लाड याला मोठी जबाबदारी मिळाली आहे. तर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनाही रिलीज करण्यात आलंय.
मुंबईने साखळी फेरीत चमकदार कामगिरी केली. मुंबईने 7 पैकी 6 सामने जिंकले. मुंबई यासह सी ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी राहिली.
निवड समितीने ऑलराउंडर अथर्व अंकोलकेर (बंड्या) आणि वेगवान गोलंदाज मोहित अवस्थी या दोघांना संधी दिली आहे. या दोघांचा चिन्मय सुतार आणि सिल्वेस्टर डिसोझा यांच्या जागी समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान मुंबई उपांत्य पूर्व फेरीत कर्नाटक विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 12 जानेवारीला होणार आहे.
बाद फेरीतील सामन्यासाठी मुंबई टीम : सिद्धेश लाड (कर्णधार), सर्फराज खान, तुषार देशपांडे, शम्स मुलानी, मोहित अवस्थी, अथर्व अंकोलेकर, तनुश कोटीयन, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, अंगकृष रघुवंशी, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, ईशान मूलचंदानी, शशांक अत्तार्डे, ओंकार तरमाळे आणि साईराज पाटील