ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्मृती मंधानाची विकेट ढापली? नेमकं काय घडलं ते पाहा

Ind W vs Aus W: भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या सामन्यात स्मृती मंधाना फक्त 24 धावा करून बाद झाली. महत्त्वाच्या सामन्यात बाद झाल्याने क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला. पण आता तिच्या विकेटवरून वादाला फोडणी मिळाली आहे. तिसऱ्या पंचांनी निर्णय देताना काय केलं? ते जाणून घ्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्मृती मंधानाची विकेट ढापली? नेमकं काय घडलं ते पाहा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्मृती मंधानाची विकेट ढापली? नेमकं काय घडलं ते पाहा
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 30, 2025 | 9:38 PM

India vs Australia Semi Final: वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 338 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान गाठण्यासाठी सलामीलाच आक्रमक खेळीची अपेक्षा होती. पण शफाली वर्मा बाद झाली आणि त्यानंतर स्मृती मंधाना 24 धावा करून बाद झाली. भारतीय संघाच्या डावात 10 व्या षटकात किम गार्थच्या गोलंदाजीवर मंधाना वादग्रस्त पद्धतीने बाद झाली. पण मंधानाने आपल्या विकेटवर आश्चर्य व्यक्त केलं. तिसऱ्या पंचांच्या निर्णय पाहून तिला धक्काच बसला. पण मैदान सोडून जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. शफाली वर्मा बाद झाल्यानंतर मंधानाची जोडी जेमिमासोबत जमली होती. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. पण पंचांच्या निर्णयामुळे ही भागीदारी फुटली आणि तंबूत जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही.

स्मृती मंधानाने एक षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 24 चेंडू 24 धावा केल्या. किम गार्थच्या लेग स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. पण तिचा प्रयत्न फसला. पंचांनी देखील वाइड असल्याचं सांगितलं. पण विकेटच्या मागे असलेल्या ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिच्या मते स्मृती बॅट लागली होती. तिने गोलंदाजाला विचारलं पण तिने तसं काही घडलं नसल्याचं सांगितलं. तिसऱ्या पंचांनी जेव्हा स्निको मीटरमध्ये चेक केलं तेव्हा मंधानाच्या बॅटचा किनारा घासून चेंडू गेल्याचं दिसून आलं. त्यानंतर पंचांनी तिला बाद असल्याचं घोषित केलं.

मंधानाला या निर्णयाचा बसला धक्का

स्मृती मंधाना देखील या निर्णयाने आवाक् झाली. तिला चेंडू बॅटला घासून गेला यावर विश्वासच बसला नाही. जेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधाराने डीआरएसची मागणी केली तेव्हा तिचा बाद नसल्याचा आत्मविश्वास होता. पण निर्णय तिच्या विरोधात आला आणि डाव संपला. मंधाना पुन्हा एकदा बाद फेरीच्या सामन्यात फेल गेली आहे. आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत सहाव्यांदा असं घडलं आहे. बाद फेरीत मंधानाने आतापर्यंत एकही अर्धशतक ठोकलेलं नाही. बाद फेरीत तिच्या फलंदाजीची सरासरी 13 पेक्षा कमी आहे.