Wasim Akram: ‘भारताने पाकिस्तानला आदेश देऊ नये’, वसीम अक्रम खवळला
जय शाह साहेब तुम्हाला बोलायचं होतं, तर तुम्ही कमीत कमी आयमच्या....

मुंबई: BCCI चे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्या एका विधानाने पाकिस्तानात भूकंप आला आहे. पाकिस्तानने हा आपल्या प्रतिष्ठेचा विषय बनवलाय. भारत आम्हाला आदेश देऊ शकत नाही, असा सूर पाकिस्तानातून उमटतोय. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयची एजीएम बैठक झाली. त्यानंतर जय शाह यांनी टीम इंडिया आशिया कप 2023 (Asia Cup 2023) टुर्नामेंट खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असं जाहीर केलं.
आशिया कप आयोजित करण्यासाठी न्यूट्रल म्हणजे त्रयस्थ ठिकाणाची निवड केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. जय शाह आशिया क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष आहेत.
पाकिस्तानची झोप उडाली
जय शाह यांच्या विधानानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने इशारा दिला आहे. या निर्णयाचा वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी टीमच्या सहभागावर परिणाम होईल. पुढच्यावर्षी भारतात वर्ल्ड कप होणार आहे. बीसीसीआयच्या सचिवाच्या विधानाने पाकिस्तानची झोप उडाली आहे. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमनेही यावर आपलं मत मांडलं आहे.
लोकांचा लोकांशी संपर्क आवश्यक
“पाकिस्तानने कसं क्रिकेट खेळावं, त्यावर भारत आदेश देऊ शकत नाही. पाकिस्तानात क्रिकेट 10-15 वर्ष उशिराने सुरु झालं. मी माजी क्रिकेटपटू, खेळाडू आहे. राजकीय स्तरावर काय घडतय, ते मला माहित नाही. पण लोकांचा लोकांशी संपर्क आवश्यक आहे” असं वसीम अक्रम म्हणाला.
मीटिंग बोलवायची
“जय शाह साहेब तुम्हाला बोलायचं होतं, तर तुम्ही कमीत कमी आमच्या चेयरमनला फोन करायला पाहिजे होता. आशियाआ काऊन्सिलची मीटिंग बोलवायची होती. तुम्ही आयडिया दिली असती, तर त्यावर चर्चा झाली असती. आम्ही नाही जाणार हे तुम्ही बोलू शकत नाही. संपूर्ण काऊन्सिलने पाकिस्तानला यजमानपद दिल आहे. हे योग्य नाहीय” असं वसीम अक्रम म्हणाला.
शाह यांच्या विधानावर पीसीबी नाराज
जय शाह यांच्या विधानानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने स्टेटमेंट जारी केलं. पीसीबीने नाराजी प्रगट केली. बोर्ड सदस्यांशी बोलल्याशिवाय बीसीसीआय सचिवाने विधान केलय, असं पीसीबीने म्हटलं आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलमध्ये दीर्घ चर्चा आणि सपोर्टनंतरच पाकिस्तानला आशिया कपच यजमानपद मिळालं.
