W, W, W… रन, कॅच आणि हॅट्रिक, एक खेळाडू संपूर्ण टीमवर भारी, मग मिळवला तुफानी विजय, Video पाहाच

Spinner Shamar Springer Hat Trick: वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानमध्ये टी20 मालिका खेळण्यात आली. यावेळी एका खेळाडूने मोठे तांडव केले. त्याच्या भेदक माऱ्यामुळे अफगाणिस्तान गारद झाला. अगोदर अफगाणिस्तानने बलाढ्य वेस्टइंडिजला चांगलंच हैराण केलं. पण या खेळाडूने सामना पालटवला.

W, W, W… रन, कॅच आणि हॅट्रिक, एक खेळाडू संपूर्ण टीमवर भारी, मग मिळवला तुफानी विजय, Video पाहाच
एकाच खेळाडूने गेम पालटवला
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Jan 23, 2026 | 10:09 AM

West Indies-Afghanistan T20 Series : एक खेळाडू कसा सामना पालटवू शकतो याचं उदाहरण वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यातून समोर आलं. टी20 विश्वचषक 2026 च्या पूर्वी दोन्ही देशात UAE मध्ये हा सामना रंगला. या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात वेस्टइंडिज संघाला मोठी धाव संख्या उभारता आली नाही. हा संघ अवघ्या 151 धावावर तंबूत परतला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो स्टार गोलंदाज ऑलराऊंडर शमार स्प्रिंगर, त्याने हॅट्रिक तर घेतलीच पण अफगाणिस्तानचे विजयाचे स्वप्न सुद्धा धुळीस मिळवले. त्याने वेस्टइंडिजला 15 धावांनी विजयी केले. इतकेच नाही तर त्याने चमकदार फलंदाजी करत संघाला एका मजबूत स्थितीत आणले. कालचा सामना जणू सबकुछ शमार स्प्रिंगरच होता.

स्प्रिंगरच्याच नावाची चर्चा

दुबईत गुरुवारी 22 जानेवारी रोजी हा सामना खेळला गेला. वेस्टइंडिजने हा सामना खेचून आणल्याने विंडीजला क्लीन स्वीप देण्याचे अफगाणिस्तानचे स्वप्न भंगले. यामध्ये स्प्रिंगरची हॅट्रिकची मोलाची भूमिका होती. वेस्टइंडिजने 152 धावांचे लक्ष ठेवले होते. अफगाणिस्तान संघाने 10 षटकात 72 धावा काढल्या. त्यामुळे अफगाणिस्तान हा सामना गुंडाळणार आणि मालिका खिशात टाकणार असे सर्वांनाच वाटत होते. पण त्याचवेळी मॅथ्यू फोर्डने इब्राहिम जादरान याला बाद केले. स्प्रिंगरने जबरदस्त झेल पकडला आणि इथूनच हा सामना पलटला. हातातून जाणारा सामना वेस्ट इंडिजच्या उमद्या स्प्रिंगरने अक्षरशः खेचून आणला. त्याची खेळी सर्वांनाच प्रेरणादायी ठरली.

19 व्या षटकाचा सर्वात मोठा थरार

त्यानंतर स्प्रिंगरने अफगाणिस्तानला मोठा झटका दिला. सेदिकुल्ला अटल तंबूत परतला. तर स्फोटक फलंदाज नबीचा झेल टिपत स्प्रिंगरने अफगाणिस्तानच्या मनसुंब्यावर पाणी फेरले. एक खेळाडू बाद आणि दोन झेल टिपणाऱ्या स्प्रिंगर याने खरी कमाल पुढे दाखवली. त्याने 19 व्या षटकात प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. यावेळी अफगाणिस्तान विजयाच्या अगदी जवळ होता. दोन षटकात 12 चेंडूत अफगाणिस्तानला 25 धावा हव्या होत्या. हे लक्ष्य सहज साध्य होणार होते. पण स्प्रिंगरने इथंही मोठा खेला केला. त्याने सुरुवातीच्या तीन चेंडूत तीन खेळाडूंना तंबूत पाठवले. त्याने हॅट्रिक केली आणि अफगाणिस्तानचं कंबरडं तोडलं. संपूर्ण अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत 8 गडी बाद 136 धावाच करू शकला. वेस्टइंडिजने हा सामना 15 धावांनी खिशात घातला. तर अफगाणिस्तानचे वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचे स्वप्नही भंगले. या एका खेळाडूने अफगाणिस्तान संघाला जेरीस आणले. त्याची आता क्रिकेट जगतात मोठी चर्चा सुरू आहे.