चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत 25 वर्षापूर्वी नेमकं काय झालं होतं? न्यूझीलंडविरुद्ध विनोद कांबळीने काय केलं?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. यामुळे टीम इंडियाची 25 वर्ष जुनी आठवण ताजी झाली आहे. कारण न्यूझीलंडने भारताला 4 गडी आणि 2 चेंडू राखून पराभूत केलं होतं. विनोद कांबळीकडे खरं तर चांगली संधी होती, पण...

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत 25 वर्षापूर्वी नेमकं काय झालं होतं? न्यूझीलंडविरुद्ध विनोद कांबळीने काय केलं?
| Updated on: Mar 05, 2025 | 10:21 PM

भारत आणि न्यूझीलंड हे संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहे. यापूर्वी न्यूझीलंडने भारताला 4 गडी आणि 2 चेंडू राखून पराभूत केलं आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं. 15 ऑक्टोबर 2000 रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नैरोबीच्या जिमखाना क्लब ग्राउंडवर सामना रंगला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमवून 264 धावा केल्या आणि विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी केली होती. सौरव गांगुलीने 130 चेंडूत 117 धावा केल्या. तर सचिन तेंडुलकर 69 धावांवर रनआऊट झाला होता. राहुल द्रविडही 22 धावांवर रनआऊट झाला होता. या सामन्यात युवराज सिंगला विनोद कांबळीच्या आधी संधी मिळाली होती. पण 18 धावा करून बाद झाला. विनोद कांबळीला या सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी होती. शेवटच्या टप्प्यात सात षटकांचा खेळ शिल्लक होता. पण 5 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला. रॉबिन सिंग 13 धावा करून तंबूत परतला. तर अजित आगरकर नाबाद 15 आणि विजय दहिया नाबाद 1 धावांवर राहिला. या स्पर्धेनंतर विनोद कांबळीच्या क्रिकेट कारकिर्दीला उतरती कळा लागली. वनडे वर्ल्डकप 2003 स्पर्धेसाठी विनोद कांबळीची स्पर्धेसाठी निवड झाली नाही.  विनोद कांबळी 29 ऑक्टोबर 2000 साली शेवटचा वनडे सामना सारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला.

भारताने दिलेलं हे आव्हान न्यूझीलंडने शेवटच्या षटकात पूर्ण केलं. न्यूझीलंडने 49.4 षटकात 6 गडी गमवून हे आव्हान गाठलं. खरं तर टीम इंडियाला या सामन्यात विजयाची संधी होती. पण मधल्या फळीत ख्रिस क्रेर्नस आणि ख्रिस हॅरीस यांनी चांगली फलंदाजी केली. ख्रिस क्रेर्नसने बाद 102 धावा करत न्यूझीलंडला जिंकून दिलं होतं. या सामन्यात वेंकटेश प्रसादने 3, अनिल कुंबळे 2 आणि सचिन तेंडुलकरने 1 गडी बाद केला होता. विशेष म्हणजे या सामन्यात युवराज सिंगने 10 षटकं टाकत 32 धावा दिल्या होत्या. झहीर खान सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. त्याने 7 षटकात 54 धावा दिल्या होत्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारताची प्लेइंग 11 : सौरव गांगुली (कर्णधार) , सचिन तेंडुलकर , राहुल द्रविड , युवराज सिंग , विनोद कांबळी , रॉबिन सिंग , अजित आगरकर , विजय दहिया (विकेटकीपर) , अनिल कुंबळे , झहीर खान , व्यंकटेश प्रसाद.

न्यूझीलंडची प्लेइंग 11 : क्रेग स्पीअरमन , नॅथन अ‍ॅस्टल , स्टीफन फ्लेमिंग (कर्णधार) , रॉजर टूस , ख्रिस केर्न्स , क्रेग मॅकमिलन , ख्रिस हॅरिस , अ‍ॅडम पॅरोर (विकेटकीपर) , स्कॉट स्टायरिस , शेन ओकॉनर , जेफ अ‍ॅलॉट