
आयपीएल 2025 स्पर्धेची पूर्ण तयारी झाली असून या स्पर्धेला 23 मार्चपासून सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. या स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडला आणि खेळाडूंची अदलाबदल झाली आहे. काही फ्रेंचायझींनी कर्णधारांना रिलीज केलं आणि इतर फ्रेंचायझींनी त्यांच्यावर मोठा डाव लावला. यात श्रेयस अय्यरही होता. कोलकाता नाईट रायडर्सला मागच्या पर्वात जेतेपद मिळवून दिलं होतं. तरीही त्याला रिलीज केल्याने आश्चर्य व्यक्त होत होतं. मेगा लिलावात पंजाब किंग्सने त्याच्यावर कोट्यवधींची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात घेतलं. इतकंच काय तर कर्णधारपदाची माळही त्याच्या गळ्यात घातली. पण केकेआरने त्याला रिलीज करण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत होता. पण खरं काय ते कोणालाच माहिती नव्हतं. अखेर या प्रश्नाचं उत्तर खुद्द श्रेयस अय्यर याने दिलं आहे. आयडिया एक्स्चेंजमध्ये चर्चा करताना श्रेयस अय्यरने मन मोकळं केलं. ‘निश्चितपणे केकेआरला जेतेपद मिळवून दिल्यानंतर खूप आनंद झाला. फॅन्सची संख्याही खूप चांगली होती. स्टेडियममध्ये उत्साह वाढवत होते आणि मी घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला.’, असं श्रेयस अय्यरने सांगितलं. त्यानंतर त्याने मुख्य प्रश्नाचं उत्तर दिलं.
‘नक्कीच, आम्ही आयपीएल चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर लगेच चर्चा केली होती. पण काही महिने कोणतीच चर्चा किंवा उत्तर आलं नाही. रिटेन्शनसाठीही काही जास्त प्रयत्न केले गेले नाहीत. मी हैराण झालो की, नेमकं काय होत आहे. चर्चा होत नसल्याने आम्ही अशा स्थितीत आलो की आम्हाला सहमतीने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.’, असं श्रेयस अय्यरने सांगितलं.
श्रेयस अय्यरने पुढे सांगितलं की, ‘मी जाहीरपणे निराश आहे. कारण तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी कोणतं निश्चित असं कारण नसतं आणि तुम्हाला रिटेन्शनच्या तारखेच्या एक आठवड्याआधी सर्व कळतं, नक्कीच काहीतरी उणीव आहे. म्हणून मला निर्णय घ्यावा लागला. जे लिहिलं आहे तेच झालं पाहीजे. पण या व्यतिरिक्त मी एकच सांगू शकतो की, शाहरूख सर, परिवार, त्या सर्वांसोबत मी जो वेळ घालवला, तो खरंच अद्भुत होता. अर्थातच चॅम्पियनशिप जिंकणे हा कदाचित माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता.’ श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला आहे. पंजाब किंग्सने त्याला 26.75 रुपयांना खरेदी केले.