W,W,W,W: क्रिकेटला वडिलांचा विरोध, नंतर खेळासाठी 13व्या वर्षी घर सोडलं अन्…; आता 4 चेंडूंत 4 विकेट घेणारा जमशेद आलम नेमका आहे तरी कोण?
Jamshed Alam Cricket Journey: रेल्वे आणि सौराष्ट्र यांच्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा गट 'ब' मधील एक रोमांचक सामना खेळला गेला. रेल्वेचा गोलंदाज जमशेद आलमने सामन्यात उल्लेखनीय पदार्पण केले.

जमशेद आलमने रविवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सलग चार बळी घेत इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा भारतीय ठरला आहे. आपल्या टी-20 पदार्पणात सलग चार बळी घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज आहे. जमशेद म्हणाला की, ही कामगिरी 10 वर्षांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. त्याने आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. क्रिकेटपटू होण्याचा निर्णय कधी घेतला हे स्पष्ट केले.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रेल्वेकडून खेळणाऱ्या जमशेद आलमच्या वडिलांनी त्याला क्रिकेट खेळू देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता, त्यामुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याने घर सोडले. माझ्या गावाचे नाव फाजिलनगर आहे. तिथे एक खूप प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धा होते, योगायोगाने तिचे नाव SMAT (शहीद मेजर अमिया त्रिपाठी स्पर्धा) आहे. माझा भाऊ अबरार अहमद टेनिस-बॉल क्रिकेट खेळायचा आणि अनेकदा SMAT चे सामने बघायला जायचा. एके दिवशी मी त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला आणि क्रिकेटने इतका प्रभावित झालो की मी क्रिकेटपटू व्हायचे ठरवले.
तेव्हा जमशेद 13 वर्षांचा होता. पण त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती क्रिकेटची फी आणि इतर खर्च भागवण्याइतकी चांगली नव्हती. आर्थिक अडचणी सर्वत्र होत्या, पण त्या लहान मुलाला याची जाणीव नव्हती आणि त्याने आपल्या शेतकरी वडिलांना आपल्या स्वप्नांबद्दल सांगितले. तो म्हणाला की, मी माझ्या वडिलांना सांगितले की मला क्रिकेटपटू व्हायचे आहे. त्यांना आश्चर्य वाटले. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.
जमशेद आलम म्हणाला की, माझ्या वडिलांनी मला क्रिकेट खेळू देण्यास नकार दिला. त्यांचा कधी उल्लेखही करू नकोस असे सांगितले. मी विचार केला, क्रिकेट किंवा काहीच नाही. माझ्याकडे अडीच हजार रुपये होते आणि मी घर सोडले. माझा मित्र शोएब खान लखनौमध्ये राहत होता आणि एका क्रिकेट अकादमीत जात होता. जेव्हा मी त्याला हे सांगितले, तेव्हा तो मला त्याच्या घरी राहायला देण्यास तयार झाला. महिनाभर माझा माझ्या वडिलांशी काहीही संपर्क नव्हता. मी भरकटलो आहे याची त्यांना खात्री पटली होती. त्याच काळात मी क्रिकेट अकादमीत जाऊ लागलो.
त्याने सांगितले की, त्याच्या भावाने प्रवेश शुल्क भरण्याचे वचन दिले होते. पण प्रशिक्षकाने त्याला आव्हान दिले. माझे प्रशिक्षक बिस्वजीत सिन्हा म्हणाले की, जर मी संघाला सामना जिंकण्यास मदत होईल असे काही स्पेल टाकले, तर ते मला विनामूल्य प्रशिक्षण देतील. मी एकट्याने पुढचे दोन सामने जिंकले आणि त्यानंतर मला कधीही कोणतेही शुल्क भरावे लागले नाही. माझ्या भावाने आणि माझ्या मित्राच्या कुटुंबीयांनी मला परत येण्यासाठी समजावले. माझे वडील अजूनही माझ्यावर खूप रागावलेले होते, पण माझ्या भावाने त्यांच्याशी तडजोड केली. त्याने माझ्या वडिलांना मला दोन वर्षांची मुदत द्यायला सांगितली. जर काहीच जमले नाही, तर मी क्रिकेट खेळणे सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करेन असे सांगितले. दोन वर्षांच्या आतच माझी उत्तर प्रदेशच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली.
जमशेद आलमचा जन्म 13 डिसेंबर 2002 रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे झाला. तो सध्या 23 वर्षांचा आहे. पुढच्या महिन्यात 13 डिसेंबरला तो 24 वर्षांचा होईल. जमशेद उजव्या हाताचा मध्यम-वेगवान गोलंदाज आहे. संधी मिळाल्यास तो खालच्या फळीत उजव्या हाताने फलंदाजी करतो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वेकडून एक टी-20 सामना खेळला आहे. त्यात त्याने 7.60 च्या सरासरीने पाच बळी घेतले आहेत. त्याला अद्याप फलंदाजीची संधी मिळालेली नाही.