महेंद्रसिंह धोनी सामन्यादरम्यान समालोचन का करत नाही? स्वत:च सांगितलं कारण…

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याच्या टिप्स भारतीय संघाला कामी येऊ शकतात. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीने समालोचनाबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

महेंद्रसिंह धोनी सामन्यादरम्यान समालोचन का करत नाही? स्वत:च सांगितलं कारण...
महेंद्रसिंह धोनी सामन्यादरम्यान समालोचन का करत नाही? स्वत: सांगितलं कारण...
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 04, 2026 | 11:04 PM

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएल 2026 स्पर्धेसाठी तयारी करत आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर फक्त आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. पण वर्षभर महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असतो. भारतीय संघाचे सामने असले तरी धोनी समालोचन करताना दिसत नाही. तसं पाहिलं तर दिग्गज क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर समालोचन करतात. पण महेंद्रसिंह धोनीच्या बाबतीत तसं नाही. महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर समालोचनापासून दूरच राहिला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याचे विचार ऐकण्याची संधी काही मिळत नाही. त्यामुळे धोनी समालोचनापासून लांब का राहात असावा असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आता महेंद्रसिंह धोनी याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. धोनीने सांगितलं की, आकडेवारी लक्षात ठेवू शकत नाही आणि त्यामुळे समालोचन करत नाही.

महेंद्रसिंह धोनीने जतीन सप्रूला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “समालोचन करणे हे खूप कठीण काम आहे. मला वाटते की खेळाचे वृत्तांकन करणे आणि खेळाडूंवर टीका करणे यात खूप पातळ रेषा असते. कधीकधी तुम्हाला कळतही नाही आणि ती रेषा ओलांडली जाते.” धोनी पुढे म्हणाला की, समालोचन करणं हे कौशल्यपूर्ण काम आहे. तुम्हाला योग्य दृष्टीकोन मांडता येणं गरजेचं आहे. जर काही चूकत असेल तर ते सांगणही महत्त्वाचं आहे. पण यामुळे कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. जर एखादा संघ पराभूत होत असेल तर त्यामागे कारणं असतात. पराभूत झाला म्हणून बोटं न दाखवता खरं काय आहे ते सांगणं म्हणजेच समोलचन असतं.

महेंद्रसिंह धोनीने सांगितलं की, ‘मी स्वत:ला एक चांगला श्रोता मानतो. मी फक्त अशा लोकांशीच मोकळेपणाने बोलतो ज्यांच्याशी मी सहजतेने बोलतो. मला सामान्यतः बोलण्यापेक्षा ऐकणे जास्त आवडते. जर मला एखाद्या विषयाचे पूर्ण ज्ञान नसेल तर मी त्यावर जास्त बोलत नाही कारण मला वाटते की ऐकणे अधिक उपयुक्त आहे.’