Suryakumar Yadav: फॉर्म परतला, बॅट तळपली; पण टीम इंडियात पुनरागमनाचं सूर्यकुमारचं स्वप्न अधुरंच राहणार? कमबॅकवर BCCI कडून मोठा खुलासा
BCCI Strategy for Suryakumar Yadav Revealed: सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघात परत येण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करत 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकून दिला होता.

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच्या भविष्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. एकेकाळी भारतीय संघाचा कर्णधार असलेला यादव आता संघात आपले स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. मात्र आता सूर्यकुमार यादवबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेत नाही आणि त्याचे संघात पुनरागमन अनिश्चित दिसत आहे. सूर्यकुमार यादवने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला. त्यानंतर आयपीएल संपताच त्याला टी-20 संघातून वगळण्यात आले आणि जून 2026 मध्ये श्रेयस अय्यरची नवीन टी-20 कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
बीसीसीआयच्या एका सूत्राने या प्रकरणी स्पष्टपणे सांगितले, सूर्या सध्या आमच्या निवड योजनेत नाही. आम्ही यशस्वी जैस्वालसारख्या तरुण खेळाडूलाही व्हाईट-बॉल संघात स्थान देऊ शकत नाही. सूर्यकुमार यादव लिस्ट ए क्रिकेटमध्ये सातत्याने मेहनत घेत आहे आणि चांगली कामगिरीही करत आहे, परंतु सध्याच्या संघ रचनेत त्याच्यासाठी कोणतीही जागा रिक्त दिसत नाही. सूर्या लिस्ट ए मध्ये मेहनत घेत आहे आणि चांगली कामगिरी करत आहे.
पण प्रश्न हा आहे की, सध्याच्या भारतीय संघात त्याला कुठे स्थान द्यायचे. सध्या संघात एकही जागा उपलब्ध नाही. जेव्हा आपण यशस्वी जैस्वालला व्हाईट-बॉल संघात सामावून घेऊ शकत नाही, तेव्हा सूर्याला कुठे स्थान मिळेल? सध्याच्या परिस्थितीत, तो संघात असेल असे आम्हाला वाटत नाही, असं त्यांनी सांगितले आहे. भारतीय संघातून वगळले गेले असूनही सूर्यकुमार यादवची बॅट देशांतर्गत टी-20 स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026-27 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. मुंबईकडून खेळताना त्याने स्फोटक खेळी करून आपला फॉर्म स्पष्टपणे दाखवून दिला आहे.
14 नोव्हेंबर रोजी हैदराबादविरुद्ध त्याने अवघ्या 21 चेंडूंमध्ये नाबाद 60 धावांची खेळी केली. या खेळीत सहा चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता, आणि त्याने अवघ्या 15 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. गुजरातविरुद्ध सूर्याने नऊ चौकार आणि सात षटकारांसह 29 चेंडूंमध्ये 82 धावांची स्फोटक खेळी खेळून मुंबईला 199 धावांचे लक्ष्य सहज गाठण्यास मदत केली.
गोव्याविरुद्धच्या तिसऱ्या फेरीत, त्याने तीन षटकारांच्या मदतीने 12 चेंडूंमध्ये 25 जलद धावा करून संघाच्या विजयातही योगदान दिले. एकीकडे सूर्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये षटकारांचा वर्षाव करत असताना, बीसीसीआयच्या भूमिकेने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. आगामी सामने आणि कामगिरीनंतर निवड समिती आपल्या निर्णयावर पुनर्विचार करेल की नाही, हे पाहणे बाकी आहे.