
वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली. पहिल्या कसोटी सामन्यात सहज विजय मिळवला. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र कस लागला. भारताने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला एक डाव आणि 140 धावांनी पराभूत केलं. तर दिल्ली कसोटी सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. पण हा सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवसापर्यंत झुंज द्यावी लागली. या कसोटीत शुबमन गिलने घेतलेल्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. खरं तर या मालिकेत वेस्ट इंडिजला फॉलोऑन देणं भारताच्या अंगलट आलं होतं असंच म्हणावं लागेल. कारण वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात सर्वच चित्र पालटलं होतं. त्यामुळे असा निर्णय घेण्याचं कारण काय? वगैरे अनेक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रीडाप्रेमी विचारत होते. या सर्व प्रश्नांची उत्तरं शुबमन गिलने दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर दिली आहेत.
कसोटी मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, “आमच्याकडे जवळपास 300 धावांची आघाडी होती आणि खेळपट्टीवर फारसे काही शिल्लक नव्हते. म्हणून आम्ही फॉलोऑन लागू करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला वाटले की आम्ही 500 धावा केल्या आणि आम्हाला पाचव्या दिवशी 6 किंवा 6 विकेट्स घ्याव्या लागल्या तरी तो आमच्यासाठी कठीण दिवस असू शकतो. तर, ती विचार प्रक्रिया होती.”
दिल्ली कसोटीत भारताने पहिल्या डावात 518 धावांची खेळी करत डाव घोषित केला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव 248 धावांवर आटोपला. त्यानंतर शुबमन गिलने फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. भारताकडे 270 धावांची आघाडी होती. पण वेस्ट इंडिजने जोरदार प्रत्युत्तर देत 390 धावांची खेळी आणि भारतासमोर 121 धावांचं आव्हान ठेवलं. भारताने हे आव्हान 3 गडी गमवून पूर्ण केलं.
नितीश कुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केल्याने अनेक प्रश्न विचारले जात होते. त्यावर शुबमन गिल म्हणाली की,, “आम्हाला विदेश दौऱ्यांवर सीम-बॉलिंग ऑलराउंडरची आवश्यकता असल्याने आम्ही नितीशला खेळवले. आम्हाला खेळाडूंना फक्त परदेश दौऱ्यांवर संधी मिळावी असे वाटत नाही.त्यामुळे खेळाडूंवर खूप दबाव येतो. आम्हाला असे काही खेळाडू तयार करायचे आहेत जे आम्हाला वाटते की आम्हाला विदेशात सामने जिंकण्यास मदत करू शकतील कारण आमच्यासाठी तेच आव्हान आहे.”