IND vs WI : विंडीजची 10 व्या विकेटसाठी चिवट भागीदारी, टीम इंडिया 121 रन्सचं टार्गेट 18 ओव्हरमध्ये पूर्ण करणार?

West Indies vs India 2nd Test : वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर सलग दुसऱ्या कसोटी विजयासाठी 121 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

IND vs WI : विंडीजची 10 व्या विकेटसाठी चिवट भागीदारी, टीम इंडिया 121 रन्सचं टार्गेट 18 ओव्हरमध्ये पूर्ण करणार?
Justin Greaves and Jayden Seales
Image Credit source: social media
| Updated on: Oct 13, 2025 | 4:34 PM

वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या 518 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या डावात 248 पर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे टीम इंडियाने विंडीजला फॉलोऑन दिला. त्यामुळे टीम इंडिया हा सामना डावाने जिंकेल, असं वाटत होतं. मात्र विंडीजने चिवट प्रतिकार केला. विंडीजने संपूर्ण तिसरा दिवस खेळून काढला. तसेच चौथ्या दिवशी विंडीजच्या फलंदाजांनी दहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे विंडीजला 100 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवता आली. जेडन सील्स आणि जस्टीन ग्रेव्हस या जोडीने दहाव्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. सील्स आऊट होताच विंडीजचा दुसरा डाव हा 390 धावांवर आटोपला. त्यामुळे आता टीम इंडियाला 121 धावांचं आव्हान मिळालं आहे.

टीम इंडियाला चौथ्या दिवशीच विजयी होण्यासाठी 18 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण करावं लागणार आहे. अन्यथा सामन्याचा निकाल हा पाचव्या दिवशी लागेल, हे निश्चित आहे. त्यामुळे आता भारताची सलामी जोडी कशी सुरुवात करते? याकडे लक्ष असणार आहे.

टीम इंडिया चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विजयी धावांजवळ पोहचल्यास काही षटकांचा खेळ वाढवला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी टीम इंडियाला फटकेबाजी करावी लागेल. आता टीम इंडियाचे फलंदाज टॉप गिअरमध्ये बॅटिंग करुन चौथ्या दिवशीच सामन्याच निकाल लावतात की विंडीज पाचव्या दिवसापर्यंत सामना खेचते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विंडीजचं दुसऱ्या डावात जोरदार कमबॅक

विंडीजच्या फलंदाजांना या मालिकेतील पहिल्या 3 डावात काही खास करता आलं नाही. मात्र विंडीजने चौथ्या डावात फॉलोऑन मिळाल्यानंतर हे चित्र बदललं आणि टीम इंडियाला झुंजवलं. विंडीजसाठी दोघांनी शतक ठोकलं. ओपनर जॉन कँपबेल आणि शाई होप या दोघांनी शतक झळकावलं. या दोघांनी आघाडी मोडून काढण्यात प्रमुख भूमिका बजावली.

जॉनने 199 चेंडूत 115 धावा केल्या. तर शाई होपने 214 बॉलमध्ये 103 रन्स केल्या. कॅप्टन रोस्टन चेज याने 40 धावांचं योगदान दिलं. तेजनारायण चंद्रपॉल 10 धावांवर बाद झाला. टेविन इम्लाच याने 12 धावांचं योगदान दिलं. तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर एक जण आला तसाच गेला. भारताने विंडीजला 311 धावांवर नववा झटका दिला. त्यामुळे आता अवघ्या काही षटकांतच सामन्याचा निकाल लागेल, असं चित्र होतं. मात्र जेडन सील्स आणि जस्टीन ग्रेव्हस या जोडीने कमाल केली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना झुंजवलं.

टीम इंडियासमोर 121 धावांचं आव्हान

जसप्रीत बुमराह याने टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असलेली ही जोडी फोडली. बुमराहने जेडन सील्स याला वॉशिंग्टन सुंदर याच्या हाती कॅच आऊट केलं. अशाप्रकारे ही जोडी फुटली. या जोडीने शेवटच्या विकेटसाठी 79 धावा जोडल्या. जेडनने 32 धावा केल्या. तर जस्टीन ग्रेव्हस 50 धावांवर नाबाद परतला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद सिराज याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.