
टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेनंतर मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघात 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआय निवड समितीने या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. टीम इंडियाची ही wtc 2025-2027 या साखळीतील दुसरी मालिका असणार आहे. शुबमन गिल भारताचं नेतृत्व करणार आहे. तर अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. विंडीज विरूद्धच्या या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून 5 खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. या खेळाडूंना संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र तसं काही होऊ शकलं नाही. तसेच या 5 खेळाडूंव्यतिरिक्त एकाने आपण खेळणार नसल्याचंच बीसीसीआयला कळवलं आहे.
बीसीसीआयने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळलं आहे. तसेच काही अशी नावं आहेत ज्यांना खरंच संधील द्यायला हवी होती. मात्र त्यानंतरही निवड समितीने त्याचा विचार केला नाही.
करुण नायर याला विंडीज विरुद्ध संधी मिळणार की नाही? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. करुणला इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी 4 सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती. मात्र करुणला या 8 डावात काही खास करता आलं नाही. त्यामुळे करुणला डच्चू मिळणार असल्याचं जवळपास निश्चित होतं. अखेर तसंच झालं.
अभिमन्यू इश्वरन याची गेल्या अनेक मालिकांमध्ये निवड करण्यात आली. मात्र अभिमन्यूची प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळण्याची प्रतिक्षा संपली नाही. अभिमन्यूला इंग्लंड दौऱ्यातही संधीची प्रतिक्षा करावी लागली. मात्र त्याला खेळवण्यात आलं नाही. आता विंडीज विरुद्ध त्याला संघात स्थानही देण्यात आलं नाही.
आकाश दीप याने इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे आकाश दीपला मायदेशातील या मालिकेसाठी हमखास संधी मिळणार असं समजलं जात होतं. मात्र सर्व उलटच झालं. आकाश दीप याला डच्चू देण्यात आलाय. आकाश दीप इराणी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. आकाश या स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडियाचं प्रतिनिधित्व करणार आहे.
ऑलराऊंडर शार्दूल ठाकुर यालाही वगळण्यात आलंय. शार्दूलला इंग्लंड दौऱ्यात काही खास करता आलं नाही. शार्दूलने 2 सामन्यांमध्ये 27 षटकांत फक्त 2 विकेट्स मिळवल्या. तसेच शार्दूलला बॅटिंगनेही काही खास करता आलं नाही. त्यामुळे शार्दूलला संधी मिळेल, याची शक्यता फार कमी होती.
अंशुल कंबोज याने इंग्लंड दौर्यातून कसोटी पदार्पण केलं होतं. अंशुलला या सामन्यात आपली छाप सोडता आली नव्हती. अंशुललाही विंडीज विरुद्ध वगळण्यात आलं आहे.
दरम्यान टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर याने फिटनेसचं कारण देत विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेत निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं.