
Bangladesh,T20 World Cup: टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. 7 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. पण बांगलादेशच्या आडमुठ्या भूमिकेमुळे या स्पर्धेत घोळ निर्माण झाला आहे. बांगलादेशने भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. आयसीसीने यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला विनवणी करत स्पर्धा खेळण्यास सांगितलं आहे. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहे. स्पर्धेतील बांगलादेशचे सामने श्रीलंकेत खेळवा असा प्रस्ताव दिला आहे. इतकंच काय तर गट बदला असा सल्ला आयसीसीला दिला आहे. असं असताना बांगलादेशचा तोरा पाहून आयसीसीचा संताप झाला आहे. आयसीसीने बीसीबीला शेवटचा इशारा दिला आहे. बांगलादेशकडे आता निर्णय घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. जर बांगलादेशने म्हणणं ऐकलं नाही तर आयसीसी आपला निकाल देणार आहे. ईएसपीएनक्रिकइंफोच्या मते, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत बांग्लादेश खेळणार की नाही याबाबतचा निर्णय आयसीसी 21 जानेवारीला घेणार आहे.
आयसीसीने बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला 17 जानेवारीला झालेल्या बैठकीत हा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे बांगलादेशकडे अंतिम निर्णय देण्यासाठी 48 तासांहून कमी अवधी शिल्लक राहिला आहे. दुसरीकडे, आयसीसीने वेळापत्रकात काहीच बदल होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बांग्लादेशला भारतात खेळण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे एकतर भारतात खेळावं लागेल किंवा स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल हे दोनच पर्याय आहेत. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काय भूमिका घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आयसीसीला बांगलादेशच्या अंतिम निर्णयाची वाट पाहात आहे. 21 जानेवारीपर्यंत बांग्लादेश काय निर्णय देतं यावर आयसीसीचं पुढचं पाऊल ठरणार आहे.
बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला तर त्यांना स्पर्धेतून बाहेर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आयसीसी क्रमवारीच्या आधाराव स्कॉटलँड संघाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत संधी देईल. त्यामुळे आयसीसीकडे पर्याय आहे. बांगलादेशने या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर त्यांचं नुकसान होणार आहे. टी20 वर्ल्डकप वेळापत्रकानुसार, बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. हा सामना कोलकात्यातली ईडन गार्डन्सवर होणार आहे. त्यानंतरचे दोन सामने यात मैदानात होतील. तर शेवटचा साखळी फेरीतील सामना नेपाळविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल.