WIND vs WL : महिला ब्रिगेड सुस्साट, टीम इंडियाचा सलग चौथा विजय, श्रीलंकेवर 30 धावांनी मात

India Women vs Sri Lanka Women 4th T20I Match Result : टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने विजयी चौकार लगावला आहे. भारताने पाहुण्या श्रीलंकेला 30 धावांनी पराभूत केलं आहे.

WIND vs WL : महिला ब्रिगेड सुस्साट, टीम इंडियाचा सलग चौथा विजय, श्रीलंकेवर 30 धावांनी मात
Women Team India
Image Credit source: Bcci Women X Account
| Updated on: Dec 28, 2025 | 11:20 PM

वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात विजयी घोडदौड कायम राखली आहे. टीम इंडियाने तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी 20I सामन्यात 30 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 222 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने या धावांचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेला 200 पार मजल मारता आली नाही. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 191 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे सलग चौथा विजय मिळवला. भारताने यासह या 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली.

स्मृती-शफालीची दीडशतकी भागीदारी

श्रीलंकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला चाबूक सुरुवात करुन दिली. त्यानंतर रिचा घोष आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी भारताला 220 पार पोहचवलं. स्मृती आणि शफाली या सलामी जोडीने 92 बॉलमध्ये 162 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर शफाली आणि दुसर्‍याच ओव्हरमध्ये स्मृती आऊट झाली.

शफालीने 46 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 12 फोरसह 79 रन्स केल्या. शफालीने 166.67 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. तर स्मृतीने 48 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह 80 धावा केल्या. त्यानंतर हरमनप्रीत आणि ऋचा या दोघींनी 23 बॉलमध्ये 53 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. रिचाने 16 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्ससह नॉट आऊट 40 रन्स केल्या. तर हरमनप्रीतने 10 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या.

श्रीलंका सलग चौथ्या सामन्यात ढेर

त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेसाठी टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिल्या 2 विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे श्रीलंकेच्या चाहत्यांना विजयाची आशा होती.  पहिल्या 2 विकेटनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे श्रीलंकेला चांगल्या सुरुवातीनंतरही 20 ओव्हरमध्ये 200 धावाही करता आल्या नाहीत. श्रीलंकेला 6 विकेट्स गमावून 191 धावाच करता आल्या.

टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम

श्रीलंकेसाठी कॅप्टन चमारी अट्टापट्टू हीने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त हसिनी परेरा हीने 33 धावांचं योगदान दिलं. तर मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांना वेळीच आऊट केलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडियाकडून अरुंधती रेड्डी आणि वैष्णवी शर्मा या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर श्री चरणी हीने 1 विकेट मिळवली.