
वूमन्स टीम इंडियाने तिरुवनंतरपुरममधील पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात श्रीलंकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारताची अडखळत सुरुवात झाली. श्रीलंकेने भारताला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना काही खास करता आलं नाही. मात्र त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर आणि अरुंधती रेड्डी या तिघींनी निर्णायक खेळी केली. त्यामुळे भारताला 175 धावांपर्यंत पोहचता आलं. आता टीम इंडिया या धावांचा यशस्वी बचाव करत सलग पाचवा सामना जिंकून श्रीलंकेचा व्हाईटवॉश करणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. टीम इंडियाने या मालिकेतील सलग आणि एकूण 4 सामने जिंकलेत. त्यामुळे भारताकडे पाचवा सामना जिंकून श्रीलंकेचा 5-0 ने धुव्वा उडवण्याची संधी आहे. त्यामुळे श्रीलंकेसमोर अंतिम सामना जिंकून लाज राखण्याचं आव्हान आहे.
श्रीलंकेने टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाला ठराविक अंतराने 5 झटके दिले. शफाली वर्मा 5, डेब्यूटंट जी कामालिनी 12, हर्लिन देओल 13, ऋचा घोष 5 आणि दीप्ती शर्मा 7 रन्स करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 5 आऊट 77 असा झाला. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने अमनजोत कौर गहीच्यासह भारताचा डाव सावरला.
अमनजोत आणि हरमनप्रीत या दोघींनी फटकेबाजी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 37 बॉलमध्ये 61 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर अमनजोत आऊट झाली. अमनजोतने 18 बॉलमध्ये निर्णायक 21 रन्स केल्या. अमनजोतनंतर कॅप्टन हरमनप्रीत आऊट झाली. हरमनप्रीतने सर्वाधिक धावा केल्या. हरमनप्रीतने 43 बॉलमध्ये 9 फोर आणि 1 सिक्ससह 68 रन्स केल्या. त्यानंतर अरुंधती रेड्डी आणि स्नेह राणा या दोघींनी तोडफोड बॅटिंग केली. या दोघींनी आठव्या विकेटसाठी 14 बॉलमध्ये नॉट आऊट 33 रन्सची पार्टनरशीप केली.
अरुंधतीने 11 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह 27 रन्स केल्या. तर स्नेह राणा 8 धावांवर नाबाद परतली. श्रीलंकेकडून कॅप्टन चमारी अट्टापट्टू, रश्मिका सेववंडी आणि कविशा दिलहारी या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर निमाशा मदुशनी हीने 1 विकेट मिळवली. त्यामुळे आता श्रीलंका हे आव्हान पूर्ण करत दौऱ्याचा शेवट गोड करणार की टीम इंडिया विजयी पंच लगावणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.