
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिग्गज संघांना मात देत भारत आणि दक्षिण अफ्रिका संघ पोहोचले आहेत. भारताची साखळी फेरीतील स्थिती एकदम नाजूक होती. उपांत्य फेरीचं गणित जर तरवर आलं होतं. त्यात उपांत्य फेरीचा सामना जिंकेल की नाही अशी स्थिती होती. पण या सर्वांवर मात करत भारताने अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेची या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली होती. दुबळ्या बांगलादेशने दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेत दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दोन्ही संघांसाठी अंतिम फेरीचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण पहिलं जेतेपद जिंकण्याची संधी दोन्ही संघांकडे आहे. 25 वर्षानंतर महिला वर्ल्डकप इतिहासात नवा विजेता मिळणार आहे. या सामन्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी महिला वर्ल्डकपबाबात विकीपीडिया पेजवर भारतीय संघाला विजेता घोषित केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
विकीपीडियाच्या वुमन्स क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या पेजवर हा आश्चर्यकारक दावा करण्यात आला आहे. शनिवारी 1 नोव्हेंबरला या पेजवर वर्ल्डकपच्या मागच्या पर्वाचा रेकॉर्ड आहे. पण यंदाच्या फायनलबाबतही नमूद करण्यात आलं आहे. सामना होण्यापूर्वीच या पेजवर भारताला विजेता घोषित करण्यात आलं आहे. या पेजवर दिलेल्या माहितीनुसार, भारताने दक्षिण अफ्रिकेला 100 धावांनी पराभूत केलं आहे. तसेच पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. ही अपडेट वाचून अनेकांना धक्का बसला असून त्याचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे.
खरंच असं झालं आहे का? की कोणी भाकीत वर्तवत हा दावा केला आहे? पण विकीपीडियावरील हा बदल खोडसाळपणाचा एक भाग आहे. कारण विकीपीडिया हे खुले एडिटिंग व्यासपीठ आहे. यात कोणीही बदल करू शकतं. विकीपीडियात बदल केला तर कारवाई वगैरे काही होत नाही. त्यामुळेच वेगवेगळ्या व्यक्ती, संघटना, देश किंवा स्पर्धांबाबत पेजमध्ये बदल होत असतात. हा फक्त विनोदाचा भाग होता की कोणाला त्रास देण्यासाठी हे मात्र कळू शकलेलं नाही. पण काही वेळातच यात दुरूस्ती करण्यात आली. या पेजवर भारत दक्षिण अफ्रिका अंतिम फेरीत माहिती काढून टाकण्यात आली आहे. आता रविवारीच 100 षटकानंतर या सामन्याचा निकाल लागणार आहे.