
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने जिंकून भारताने चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने पराभूत केलं होतं. सलग तीन सामन्यात पराभव झाल्याने उपांत्य फेरीचं गणित गडबडलं होतं. पण भारताने न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत केलं आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली. उपांत्य फेरीत भारतासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी धडक मारली आहे. या तिन्ही संघांनी साखळी फेरीत भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. उपांत्य फेरीत कोणासोबत सामना करावा लागतो याची गणित बांधत आहेत. भारताचा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी होऊ शकतो. कारण भारताने बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तरी चौथ्या स्थानात काही फरक पडणार नाही.
दुसरीकडे, इंग्लंडने न्यूझीलंडविरूद्धचा शेवटचा सामना जिंकला तर जास्तीत जास्त दुसऱ्या स्थानावर मजल मारू शकतात. इंग्लंडचे 9 गुण असून शेवटचा सामना जिंकला तर 11 गुण होतील. पण ऑस्ट्रेलियाचे आताच 11 गुण, तर दक्षिण अफ्रिकेचे 10 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाला 13 गुण तर दक्षिण अफ्रिकेला 12 गुण करण्याची संधी आहे. त्यामुळे भारताचा सामना टॉपला असलेल्या संघाशी होणार आहे. या स्थानावर ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिका विराजमान होऊ शकते. या दोन पैकी एका संघाशी भारताचा सामना होईल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना होत आहे. या सामन्यातील विजयी संघ भारताची भिडेल.
उपांत्य फेरीचा सामना खेळण्यापूर्वी भारताला चाचपणी करण्याची एक संधी साखळी फेरीत असणार आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला काही गोष्टी सुधारण्याची संधी मिळणार आहे. खासकरून गोलंदाजीत भारताला काम करावं लागणार आहे. कारण या स्पर्धेत भारताची गोलंदाजी फार काही प्रभावी दिसली नाही. दुसरीकडे, उपांत्य फेरीतील पहिला सामना 29 सप्टेंबरला गुवाहाटी क्रिकेट स्टेडियमवर, तर दुसरा सामना 30 सप्टेंबरला डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला जाईल.