
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय पण फसला असंच म्हणावं लागेल. कारण बांगलादेशने पाकिस्तानची पिसं काढली. पाकिस्तानला पूर्ण 50 षटकंही खेळता आली नाही. पाकिस्तानचा डाव 38.3 षटकात 129 धावांवर आटोपला. पाकिस्तानने बांगलादेशसमोर विजयासाठी 130 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशने हे आव्हान 31.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. पाकिस्तानकडून रमीन शमीम आणि कर्णधार फातिमा साना यांनी प्रत्येकी 23 आणि 22 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज 20 च्या पुढे धावा करू शकला नाही. बांगलादेशकडून शोमा अक्तरने सर्वाधिक विकेट घेतल्या. तिने 3.3 षटकात 5 धावा देत 3 गडी बाद केले. तर नाहिदा अक्तर आणि मारुफा अक्तर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर निशिता निशी, फहिमा खातुन आणि रबेया खान यांनी प्रत्येकी 1 गडी तंबूत पाठवला.
पाकिस्तानने दिलेल्या विजयी धावांचा पाठलाग करता बांगलादेशला 7 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर शामिम अक्तरही 10 धावा करून तंबूत परतली. पण रुबया हैदर एका बाजूने खिंड लढवत होती. तिने 77 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 8 चौकार मारले. तर कर्णधार निगर सुल्तानाने 44 चेंडूत 23 धावा केल्या आणि बाद झाली. तिथपर्यंत सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट झाला होता. सोबना मोस्तरीने 19 चेंडूत नाबाद 24 धावांची खेळी करत रुबयाला साथ दिली आणि विजयश्री खेचून आणला. पाकिस्तानचा पुढचा सामना भारताशी होणार आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तानने नांगी टाकल्याचं दिसून आलं आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे.
पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार फातिमा सना म्हणाली की, पहिल्या काही षटकांतच त्यांना लवकर विकेट मिळाल्या. हा टर्निंग पॉइंट होता. येणाऱ्या काळात आम्ही पुन्हा परतण्याचा प्रयत्न करू आणि आशा आहे की आम्ही जिंकू. मी असे म्हणणार नाही की आम्ही सुरुवातीलाच कोसळलो. पुढच्या वेळी आमच्या योजना चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न करू. काही खेळाडू विश्वचषकात पहिल्यांदाच खेळत आहेत आणि त्यांच्यावर दबाव आहे. प्रत्येकजण सामना जिंकणारा आहे आणि क्रीजवर शांत राहण्याची गरज आहे. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आशा आहे की, आमच्या पुढील कामगिरीत ते दिसून येईल. वेगवान गोलंदाजांसाठी चांगली खेळपट्टी होती. सीमिंग होती. फलंदाजीसाठीही चांगली होती पण आम्ही आमच्या योजना राबवल्या नाहीत.’