शुबमन गिलमुळे अभिषेक शर्मावर टीममधून आऊट होण्याची आली होती वेळ, स्वत:च सांगितलं काय घडलं ते
आशिया कप 2025 स्पर्धेत अभिषेक शर्माने क्रीडारसिकांची मनं जिंकली. त्याची खेळी पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. असं असताना अभिषेक शर्माने काही किस्से शेअर केले आहेत. यात गिलमुळे अडचणीत आल्याचं देखील त्याने सांगितलं.

आशिया कप स्पर्धेत भारताकडून शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी ओपनिंग केली. शुबमन गिलची बॅट काही खास चालली नाही. पण अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. या स्पर्धेतील एकूण 7 सामन्यात त्याने 314 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर शुबमन गिलने त्याचं कौतुक केलं. गिल आणि अभिषेक हे चांगले मित्र आहे. अंडर 16 पासून एकत्र खेळत आहेत. असं असताना एका मुलाखतीत अभिषेकने मजेदार किस्सा शेअर केला आहे. शुबमन गिलमुळे संघातून बाहेर जाण्याची वेळ आल्याचं त्याने सांगितलं. त्याने किस्सा ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेमकं तेव्हा काय घडलं होतं? ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात गौरव कपूरशी बोलताना सांगितलं. इतकंच काय तर गिल चुकीचं करताना कधीच पकडला गेला नाही हे देखील सांगितलं.
अभिषेक शर्मा किस्सा सांगताना म्हणाला की, ‘आम्ही धर्मशाळेत अंडर 16 सामना खेळत होतो. तेव्हा हिमाचल, दिल्ली आणि पंजाबचे खेळाडू होते. आमचे मैदान हॉटेलपासून फक्त 500 मीटर अंतरावर होतं. आम्ही तिथे बसने जायचो. पण बस ड्रायव्हर गाणी बंद करायचा. त्यानंतर आम्ही पंजाबी गाणी वाजवायचो आणि तेही खूप मोठ्या आवाजात… ड्रायव्हर म्हणायचा की तो गाणी वाजवणार नाही. त्यामुळे वाद व्हायचे.. यात शुबमन गिल पुढे असायचा. एक दिवस सर्व ड्रायव्हर्सनी आमची प्रशिक्षकाकडे तक्रार केली. तसेच तुमची मुलं खूपच असभ्य असल्याचं सांगितलं.’
“Abhishek Sharma shares a mischievous story about Shubman Gill!” pic.twitter.com/hDhu9kPGdk
— GillTheWill (@GillTheWill77) October 2, 2025
अभिषेक शर्मा पुढे म्हणाला की, ‘ड्रायव्हरच्या तक्रारीनंतर प्रशिक्षकांनी आम्हाला सर्वांना बोलवलं. तसेच एका रांगेत समोर उभं केलं. त्यात मी, प्रभसिमरन आणि गिलही होता. ड्रायव्हरने सर्वांना ओळखलं. पण त्यात गिल नसल्याचं सांगितलं. प्रशिक्षकाने आम्हा चौघांना बाहेर बोलावलं आणि घरी पाठवण्याच्या पत्रावर सही करण्यास सांगितलं. मी त्यांना विचारलं की गिलला का पकडलं नाही. कारण त्याच्यामुळे आमच्यावर अशी वेळ आली होती.’ अभिषेक शर्माने पुढे शुबमन गिलच्या हिडन टॅलेंटचा खुलासा देखील केलं. शुबमन गिल चेहऱ्यावरचे हावभाव बदलण्यात तरबेज असल्याचं त्याने सांगितलं. आता हसत असेल तर लगेच सीरियस होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावर कोणी संशय घेत नाही.
