Women’s World Cup 2025 : भारत श्रीलंका वनडे सामन्यात अशी असू शकते प्लेइंग 11, जाणून घ्या

आशिया कप स्पर्धेचा थरार संपल्यानंतर आता क्रीडारसिकांना वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेची अनुभूती घेता येणार आहे. 30 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना श्रीलंकेशी होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह उतरू शकतात, ते जाणून घेऊयात.

Womens World Cup 2025 : भारत श्रीलंका वनडे सामन्यात अशी असू शकते प्लेइंग 11, जाणून घ्या
भारत श्रीलंका वनडे सामन्यात अशी असू शकते प्लेइंग 11, जाणून घ्या
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 29, 2025 | 9:29 PM

आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात यजमान भारत आणि श्रीलंका यांच्या सामन्याने होणार आहे. हा सामना 30 सप्टेंबर रोजी गुवाहटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत विजयाने सुरुवात करण्यास आतुर असणार आहे. साखळी फेरीचे सर्व सामने रॉबिन राउंड पद्धतीने असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघासोबत एक सामना होणार आहे. भारत महिला आणि श्रीलंका महिला संघ 35 वेळा वनडे क्रिकेटमध्ये आमनेसामने आले आहेत. यात भारताचं पारडं जड दिसून आलं आहे. भारताने श्रीलंकेला 31 वेळा पराभवाची धूळ चारली आहे. तर श्रीलंकेला फक्त 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाचं पारडं जड आहे. भारताने सराव सामन्यात न्यूझीलंडला दोनदा पराभूत केलं. पण इंग्लंडकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. असं असलं तरी या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंचा फॉर्म दिसून आला. दुसरीकडे, सराव सामन्यात श्रीलंकेचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 1 धावेने पराभव केला. त्यामुळे श्रीलंकन संघात तशी काही विजयाची ऊर्जा दिसत नाही. त्यामुळे भारताला या सामन्यातून विजयी सुरुवात करण्याची संधी आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

भारतीय महिला संघ : प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, एन चरणी, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी.

श्रीलंका महिला संघ : हसिनी परेरा, चमारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, कविशा दिलहारी, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), मलकी मदारा, उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 8 संघ आहेत. प्रत्येक संघाला साखळी फेरीत सात सामने खेळायचे आहे. त्यापैकी किमान 6 सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीत स्थान पक्क होईल. आठ पैकी टॉप चार संघांना उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळेल. टॉपला असलेल्या संघ चौथ्य क्रमांकाशी, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकात उपांत्य फेरीची लढत होईल.