
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने कमबॅक केलं आहे.स्पर्धेच्या 11 व्या सामन्यात न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ आमनेसामने आले होते. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडची सुरूवात काही खास झाली नाही. अवघ्या 38 धावांवर तीन धक्के बसले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला होता. त्यानंतर कर्णधार सोफी डिवाईन आणइ ब्रूक हालिडे यांनी शतकी भागीदारी केली. त्याच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडचा डाव सावरला. सोफिने 85 चेंडूत 63 आणि ब्रूकने 104 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने 50 षटकात 9 गडी गमवून 227 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना बांगलादेशची त्रेधातिरपीट उडाली. एका पाठोपाठ एक धडाधड विकेट पडले.
बांगलादेशने विजयी धावांचा पाठलाग करताना टप्प्याटप्याने विकेट गमवल्या. तर प्रत्येक विकेटनंतर न्यूझीलंडचा विजय पक्का होत गेला. न्यूझीलंडला पहिली विकेट 7 धावांवर मिळाली. त्यानंतर 13 धावांवर दुसरी, 22 धावांवर तिसरी, 30 धावांवर चौथी आणि पाचवी, 33 धावांवर सहावी, 66 धावांवर सातवी, 110 धावांवर आठवी, 125 धावांवर नववी आणि 127 धावांवर शेवटची विकेट मिळाली. म्हणजेच विजयी धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 127 धावांवर तंबूत परतला. न्यूझीलंडने हा सामना 100 धावांनी जिंकला. या विजयासह न्यूझीलंडने 2 गुणांची कमाई केली आहे.
न्यूझीलंडचा संघ सातव्या स्थानावर होता. या विजयानंतर न्यूझीलंडने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंडचे 2 गुण आणि नेट रनरेट -0.245 इतका आहे. न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम आहेत. पण पुढच्या प्रत्येक सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. नाही तर गणित जर तरवर येईल. ऑस्ट्रेलियाचा संघ 5 गुण आणि +1.960 नेट रनरेटसह पहिल्या, इंग्लंडचा संघ 4 गुण आणि +1.757 नेट रनरेटसह दुसऱ्या, भारतीय संघ 4 गुण आणि +0.953 नेट रनरेटसह तिसऱ्या आणि दक्षिण अफ्रिकेचा संघ 4 गुण आणि -0.888 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. टॉपच्या चार संघांना उपांत्य फेरीत जागा मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर आता ही चुरस वाढणार आहे.